Ayush Mhatre Breakes Suresh Raina’s Record: चेन्नई सुपर किंग्जचा युवा फलंदाज आयुष म्हात्रे आयपीएलच्या इतिहासात सर्वात कमी वयात अर्धशतक करणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. यामध्ये राजस्थान रॉयल्सचा १४ वर्षांचा वैभव सूर्यवंशी पहिल्या स्थानावर आहे. त्याने फक्त १४ वर्षे आणि ३२ दिवसांच्या वयात आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर राजस्थान रॉयल्सच्या रियान परागचे नाव येते. त्याने २०१९ मध्ये १७ वर्षे १७५ दिवसांच्या वयात अर्धशतक झळकावले होते. या दोन दिग्गजांनंतर आयुष म्हात्रे आता तिसऱ्या स्थानावर आला आहे. काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध त्याने १७ वर्षे २९१ दिवसांच्या वयात अर्धशतक झळकावले.
या तीन खेळाडूंनंतर, संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांची नावे अव्वल ५ फलंदाजांमध्ये मध्ये चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहेत. सॅमसनने २०१३ मध्ये १८ वर्षे १६९ दिवसांच्या वयात आरसीबीविरुद्ध अर्धशतक झळकावले होते, तर पृथ्वी शॉने २०१८ मध्ये १८ वर्षे १६९ दिवसांच्या वयात केकेआरविरुद्ध अर्धशतक झळकावले होते.
रैनाचा १७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
दरम्यान, बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या रोमांचक सामन्यात चेन्नई सुपर किंग्जला यंदाच्या आयपीएल हंगामातील ९ वा पराभव पत्करावा लागला. पराभवानंतरही, पाच वेळा आयपीएल विजेत्या संघासाठी एक चांगली गोष्ट घडली आहे आणि ती म्हणजे १७ वर्षीय आयुष म्हात्रे, ज्याने २१४ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना वादळी खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने चेन्नई सुपर किंग्जचा माजी दिग्गज फलंदाज सुरेश रैनाचा १७ वर्ष जुना विक्रम मोडला.
चेन्नईकडून सर्वात कमी वयात अर्धशतक झळकावणारे फलंदाज
वय | खेळाडू |
१७ वर्षे २९१ दिवस | आयुष म्हात्रे विरुद्ध बंगळुरू, २०२५ |
२१ वर्षे १४८ दिवस | सुरेश रैना विरुद्ध मुंबई, २००८ |
२२ वर्षे १४२ दिवस | सॅम करन विरुद्ध मुंबई, २०२० |
२३ वर्षे ७६ दिवस | पार्थिव पटेल विरुद्ध राजस्थान रॉयल्स, २००८ |
९ चौकार आणि पाच षटकारांची आषतबाजी
या सामन्यात आयुष म्हात्रेने ५५ चेंडूत ९ चौकार आणि पाच षटकारांसह ९४ धावा केल्या. केवळ १७ वर्षे आणि २९१ दिवसांचा असताना, म्हात्रे चेन्नई सुपर किंग्जसाठी अर्धशतक करणारा सर्वात तरुण खेळाडू ठरला आहे. या खेळीसह त्याने २००८ च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध २१ वर्षे आणि १४८ दिवसांच्या वयात अर्धशतक ठोकणाऱ्या सुरेश रैनाचा विक्रम मोडला.