Deepak Chahar wants CSK and RR to buy him in IPL 2025 Auction : भारताचा वेगवान गोलंदाज दीपक चहरला विश्वास आहे की त्याची माजी फ्रँचायझी चेन्नई सुपर किंग्स आयपीएल २०२५ च्या मेगा ऑक्शनमध्ये त्याच्यासाठी बोली लावेल. दीपक हा बऱ्याच काळापासून सीएसके सेटअपचा भाग राहिला आहे, परंतु गेल्या दोन मोसमात तो दुखापती झगडत आहे. या कारणामुळे तो टीम इंडियातून बाहेर पडत आहे. यंदा पुन्हा त्याला सीएसके संघाने रिटेन केले नाही. त्यामुळे तो लिलावात दिसणार आहे. विशेष म्हणजे तरी पण त्याला सीएसके फ्रँचायझी त्याच्यासाठी बोली लावेल, असा विश्वास आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपक चहर काय म्हणाला?

आयपीएल २०२२ च्या हंगामातही त्याला सीएसकेने रिटेन केले नव्हते. त्यामुळे तो लिलावात सहभागी झाला होता. तेव्हा फ्रँचायझीने त्याला विकत घेण्यासाठी १४ कोटी रुपये खर्च केले होते. अलीकडील संभाषणात, चहरने पुन्हा एकदा संघासाठी खेळण्याची इच्छा व्यक्त केली आणि सांगितले की पॉवरप्ले ओव्हर्समध्ये विकेट्स घेण्याची त्याची क्षमता क्रिकेटच्या सध्याच्या युगात कोणत्याही संघासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यामुळे दीपक चहरला विश्वास आहे की त्याच्या मागील कामगिरीमुळे सीएसके पुन्हा एकदा त्याच्यासाठी बोली लावेल.

पॉवरप्लेमध्ये धावांवर अंकुश लावण्याची क्षमता –

टाईम्स ऑफ इंडियाशी बोलताना दीपक चहर म्हणाला की, “गेल्या मेगा ऑक्शनमध्येही त्यांनी मला रिटेन केले नव्हते. पण त्यांनी माझ्यासाठी बोली लावली आणि मला परत विकत घेतले. मला माहित नाही की यावर्षी काय होईल, परंतु मला माहित आहे की माझ्या कौशल्यांना आता अधिक महत्त्व दिले जाईल. कारण पॉवरप्लेमध्ये सुमारे ९०-१०० धावा केल्या जात आहेत आणि म्हणूनच संघ २०० हून अधिक धावा करत आहेत. पॉवरप्लेमध्ये धावांवर अंकुश लावण्यासाठी माझ्यात किती क्षमता आहे? हे मी सिद्ध केले आहे.”

सीएसके संघ पुन्हा बोली लावेल –

दीपक चहर म्हणाला की, जर तो त्याच्या कारकिर्दीत पुन्हा सीएसकेकडून खेळू शकला नाही, तर राजस्थान रॉयल्सने लिलावात त्याच्यासाठी बोली लावावी, असे वाटते. तो म्हणाला, “मला वाटते की सीएसके संघ पुन्हा माझ्यासाठी बोली लावेल. मी पुन्हा एकदा पिवळी जर्सी घालू इच्छितो आणि जर सीएसकेने बोली लावली नाही, तर राजस्थान रॉयल्सने माझ्यासाठी बोली लावावी.” सीएसकेने लिलावापूर्वी कर्णधार ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मथिशा पाथिराना आणि एमएस धोनी यांना रिटेन केले आहे. अशात सीएसकेकडे एक राईट टू मॅच कार्ड शिल्लक आहे. या माध्यमातून ते कोणत्याही कॅप्ड खेळाडूचा संघात समावेश करू शकतात.

दीपक चहरची कारकीर्द –

दीपक चहरने भारताकडून आतापर्यंत १३ वनडे आणि २५ टी-२० सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने आयपीएलमध्ये ८१ सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर एकदिवसीय सामन्यात १६, टी-२० मध्ये ३१ आणि आयपीएलमध्ये ७७ विकेट्स आहेत. टी-२० मध्ये भारतासाठी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी म्हणजे सात धावांत सहा विकेट्स आणि एकदिवसीय सामन्यात २७ धावांत तीन विकेट्स आहे. त्याची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी म्हणजे १३ धावांत चार विकेट्स आहे.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deepak chahar wants chennai super kings and rajasthan royals to buy him in ipl 2025 mega auction vbm