IPL 2025 How can Mumbai Indians reach playoffs: गुजरात टायटन्स संघाने मुंबई इंडियन्सच्या विजयीरथाला पूर्णविराम लावला. गुजरातने वानखेडेवर खेळवलेल्या गेलेल्या सामन्यात मुंबईचा अखेरच्या चेंडूवर पराभव करत सामना ३ विकेट्सने जिंकला. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात दोन वेळा सामना थांबून पुन्हा सुरू झाला आणि गुजरातने बाजी मारली. गुजरातने केलेल्या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफसाठी कसा पात्र ठरणार, जाणून घेऊया.

मुंबई वि. गुजरात सामन्यातील दुसऱ्या डावात वादळी वारा आणि पावसाने सुरूवातीपासूनच हजेरी लावली. पावसामुळे दोन वेळा सामना थांबवण्यात आला. एकदा मुंबई तरी एकदा गुजरातचा संघ सामन्यात पुढे होता. अखेरीस १९ षटकांचा सामना खेळवण्यात आला आणि ६ चेंडूत गुजरातला विजयासाठी १५ धावांची गरज होती. दीपक चहरच्या अखेरच्या षटकातील अखेरच्या चेंडूवर डायरेक्ट हिट चुकल्याने फलंदाज धावबाद झाला नाही आणि गुजरातने विजय मिळवला.

गुजरात टायटन्सचा संघ या विजयानंतर ११ सामन्यात १६ गुणांसह आणि सर्वाधिक नेट रन रेटसह पहिल्या स्थानी पोहोचला आहे. तर मुंबई इंडियन्सचा संघ १२ सामन्यांमध्ये १४ गुणांसह चौथ्या स्थानी घसरला आहे. मुंबईला जर प्लेऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर काय करावं लागणार?

मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफसाठी कसा पात्र ठरणार? (Mumbai Indians IPL 2025 Qualification Scenario)

मुंबई इंडियन्सचा संघ प्लेऑफमध्ये पात्रता मिळवण्यासाठी अजूनही शर्यतीत आहे. मुंबईचे अजून दोन सामने बाकी आहेत. संघाचा एक सामना पंजाब किंग्सविरूद्ध धरमशाला इथे होणार आहे. तर दुसरा सामना वानखेडेच्या मैदानावर दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होणार आहे. मुंबईला प्लेऑफमध्ये पात्रता मिळवण्याकरता दोन्ही सामने जिंकायचे आहेत, पण एक सामना जिंकला तरी संघ क्वालिफाय होऊ शकतो, कारण संघाचा नेट रन रेट खूप चांगला आहे.

मुंबई इंडियन्सला टॉप-२ मध्ये स्थान मिळवणं कठीण

टॉप-२ मध्ये स्थान मिळविण्याच्या मुंबईच्या आशांना मोठा फटका बसला आहे कारण ते आता रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB) आणि गुजरात टायटन्स (GT) यांच्यापेक्षा दोन गुणांनी मागे आहेत. तिसऱ्या स्थानावर असलेले पंजाब किंग्सदेखील एक गुणाने पुढे आहे आणि या तिन्ही संघांनी ११ सामने खेळले आहेत, तर मुंबईच्या संघाचे १२ सामने झाले आहेत.

प्लेऑफच्या शर्यतीतील तिन्ही संघांपैकी किमान एका संघाने तरी एक सामना गमाववा अशी मुंबईला प्रार्थना करावी लागेल. तसेच पंजाब किंग्सचा संघ त्यांच्या उर्वरित तीन सामन्यांपैकी किमान दोन सामने गमावेल अशी आशा ठेवावी लागेल. यादरम्यान, जर मुंबईने त्यांचे दोन्ही सामने जिंकले तर मुंबई इंडियन्स प्लेऑफसाठी पात्र ठरू शकते. मुंबईचा रन रेट स्पर्धेत इतर संघांपेक्षा खूप चांगला आहे.

टॉप-२ मध्ये स्थान मिळवणाऱ्या संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात, तर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघाला ट्रॉफी जिंकण्यासाठी पाच दिवसांत तीन सामने जिंकावे लागतात. २०११ मध्ये प्लेऑफ पद्धत सुरू झाल्यापासून, १४ वर्षांपैकी १३ वर्षांत पहिल्या दोनमध्ये स्थान मिळवणाऱ्या संघाने आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे, ज्यामध्ये २०१६ मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) हा एकमेव अपवाद होता.