आयपीएल २०२३ मध्ये लखनऊविरुद्ध बंगळुरू यांच्यातील सामन्यादरम्यान विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वाद झाला. हा सामना आरसीबीच्या शानदार विजयसाठी नाही पण यांच्या भांडणासाठी नक्कीच ओळखला जाईल. कोहली-नवीनची शाब्दिक चकमक आणि गंभीरशी झालेला वाद यामुळे हा सामना चर्चेत आला. या सामन्यात विराट कोहली वेगवेगळ्या खेळाडूंसोबत अडकत राहिला, ज्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मात्र, सर्वाधिक चर्चा विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात होत आहे. हे दोन खेळाडू आयपीएलमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने आले आहेत. याआधी २०१३ मध्येही हे दोघे आमनेसामने आले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गौतम गंभीर आणि विराट कोहली एकेकाळी खूप चांगले मित्र होते. हे दोन्ही खेळाडू दिल्लीसाठी देशांतर्गत क्रिकेट खेळले आहेत. अशा स्थितीत गंभीरने कोहलीला आपला लहान भाऊ मानला होता. २००९ साली जेव्हा विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले होते. याच सामन्यात गौतम गंभीरने १५० धावांची खेळी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले. मात्र, गंभीरने हा पुरस्कार विराट कोहलीला दिला. यानंतर गंभीरचे सर्वत्र कौतुक झाले, कारण त्याने तरुण खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी त्याग केला.

धोनीमुळे तेढ निर्माण झाली

धोनीमुळे गंभीर आणि कोहली यांच्यातील मैत्री तुटल्याचे क्रीडा जगताशी संबंधित अनेकांचे मत आहे. गौतम गंभीरला महेंद्रसिंग धोनी फारसा आवडत नव्हता. त्याचबरोबर विराट कोहली सुरुवातीपासूनच धोनीच्या जवळच्या खेळाडूंमध्ये सामील आहे. याच कारणावरून गौतम गंभीर आणि विराट कोहली यांच्यातही खडाजंगी झाली होती. मात्र, हे कारण त्यांनी उघडपणे कोणाकडेही बोलून दाखवले नाही, असे काही क्रीडा पत्रकार सांगतात.

हेही वाचा: GT vs DC Match: शमीच्या भेदक माऱ्यापुढे कॅपिटल्सचे फलंदाज गारद, दिल्लीचे गुजरातसमोर विजयासाठी केवळ १३१ धावांचे आव्हान

आयपीएल २०१३ मध्ये झाला होता वाद

आयपीएल २०१३ मध्ये, गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार होता आणि विराट कोहली आरसीबीकडून खेळला होता. विराट एका सामन्यात बाद झाला पण त्याला तो बाद कसा झाला? यावर विश्वासच बसत नव्हता. तो निराश होऊन खेळपट्टीवरच उभा राहिला. अशा स्थितीत गंभीरने कोहलीला काही अपशब्द उच्चारले आणि तो पुढे म्हणाला की, “तू मैदानाबाहेर का जात नाहीस.” कोहलीला गंभीर काय बोलला हे नीटस ऐकू न आल्याने त्याने पुन्हा विचारले की, “तू काय बोललास.” यावर गंभीरने शिवीगाळ, अपशब्द वापरत आपला मुद्दा पुन्हा सांगितला. याला कोहलीनेही जशास तसे उत्तर देत काही अपशब्दही उच्चारले. दोन्ही खेळाडू एकमेकांच्या खूप जवळ आले पण उर्वरित खेळाडू आणि अंपायर्सने दोघांना बाजूला केले.

विराट आणि गंभीर यांच्यातील मतभेदाला इथूनच खरी सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर हे दोन्ही खेळाडू कधीही एकाच मंचावर एकत्र कधीही आले नाहीत. गंभीर आणि विराटमधील मतभेदाच्या चर्चा वेगवेगळ्या प्रसंगी समोर येत राहिल्या, पण १० वर्षांनी पुन्हा आयपीएल २०२३ मध्ये हे मतभेद चव्हाट्यावर आले.

हेही वाचा: IPL2023: नवीन उल हक म्हणजे विराटच्या पायाची धूळ? चाहत्यांच्या Videoवर संतप्त प्रतिकिया

आयपीएल २०२३ मध्ये काय झाले

या मोसमात लखनऊ आणि बंगळुरू यांच्यातील पहिला सामना चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. हा रोमांचक सामना लखनऊने शेवटच्या चेंडूवर एका विकेटने जिंकला. यानंतर लखनऊच्या खेळाडूंनी आक्रमक पद्धतीने सेलिब्रेशन केले. संघाचा मार्गदर्शक गौतम गंभीरने बंगळुरूच्या चाहत्यांना विजयानंतर शांत राहण्याचे संकेत दिले. यानंतर दुसऱ्या सामन्यात जेव्हा आरसीबी संघ विजयाच्या जवळ पोहोचला तेव्हा विराट कोहलीने नवीन-उल-हकला काहीतरी बोलला. यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अमित मिश्राने कोहलीला रोखण्याचा प्रयत्न केला असता तो त्याच्याशीही भिडला.

सामना संपल्यानंतर हस्तांदोलन करतेवेळी कोहली आणि नवीन उल हक यांच्यात पुन्हा वाद झाला. यानंतर काइल मेयर्सने कोहलीशी याच्या फलंदाजी संदर्भात काही बातचीत करत असताना गंभीरने येऊन मेयर्सला हात धरून त्याच्यासोबत नेले. बाजूला नेत असताना मेयर्सला यावेळी गंभीर कोहलीला काहीतरी बोलला. गंभीरचे म्हणणे ऐकून विराटनेही उत्तर दिले आणि दोघे एकमेकांमध्ये भिडले. शेवटी दोन्ही संघातील खेळाडूंनी विराट आणि गंभीरला बाजूला केले. यानंतर लोकेश राहुलने विराट कोहलीशी बराच वेळ चर्चा करून त्याला शांत केले.

मराठीतील सर्व आयपीएल २०२५ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In ipl 2023 just few years before gautam gambhir gave his award to virat kohli and now have heated argument avw