IPL 2024 Impact Players Performance Updates : आयपीएल ही एक अशी स्पर्धा आहे, जी युवा लीग म्हणूनही ओळखली जाते. दरवर्षी या लीगमधून अनेक खेळाडू रातोरात स्टार बनतात. आयपीएल २०२४ मध्ये गेल्या १० दिवसांत पाच असे फलंदाज पाहिले. ज्यांनी त्यांच्या आक्रमक शैलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं. या सर्व खेळाडूंची सामन्यात प्रभावशाली खेळाडू म्हणून एन्ट्री झाली होती. ज्यामध्ये काही खेळाडूंना आपल्या संघाला विजय मिळवून देण्यात आला, तर काही खेळाडू अपयशी ठरले पण त्यांना चाहत्यांची मनं जिंकण्यात यश आले.

मुंबईचा युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसने गुजरातविरुद्ध रोहितसह झंझावाती खेळी केली. त्याला प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरवले होते. यादरम्यान ब्रेविसने केवळ ३८ चेंडूत ४६ धावा केल्या, त्याच्या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. मात्र हा सामना मुंबई इंडियन्सने गमावला.

पंजाब आणि दिल्ली यांच्यातील सामन्यात प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या अभिषेक पोरेलने शिखर धवनच्या संघाला श्वास रोखून धरायला लावला. त्याने ७ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत दमदार फटकेबाजी केली. अभिषेक पोरेलने अवघ्या १० चेंडूत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा केल्या. या खेळीमुळे दिल्लीने स्कोअरबोर्डवर १७४ धावा केल्या, प्रत्युत्तरात पंजाबने ४ चेंडू बाकी असताना ४ गडी राखून सामना जिंकला.

हेही वाचा – T20 World Cup 2024 : विश्वचषकापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्का! स्टार अष्टपैलू खेळाडूने आगामी स्पर्धेतून घेतली माघार

गेल्या मोसमात २२ वर्षीय साई सुदर्शनने शानदार फलंदाजी करत निवड समितीच्या नजरेत स्थान निर्माण केले होते. आयपीएल २०२३ च्या फायनलमध्ये शानदार खेळी केल्यानंतर साई सुदर्शनच्या बॅटने देशांतर्गत सामन्यांमध्येही चांगली कामगिरी केली. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध साई सुदर्शनची बॅट तळपलेली पाहायला मिळाली. त्याने या सामन्यात ३६ चेंडूत ४ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ४५ धावा केल्या.

सीएसकेचा स्टार अष्टपैलू शिवम दुबे गेल्या वर्षीपासून त्याच्या यशाच्या शिखरावर असल्याचे दिसत आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याने आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांची मने जिंकली. यानंतर आयपीएल २०२४ च्या पहिल्याच सामन्यात शिवम दुबे प्रभावशाली खेळाडू म्हणून मैदानात उतरला. त्याने अवघ्या २८ चेंडूंत ४ चौकार आणि १ षटकार खेचून आरसीबीचे कंबरडे मोडले आणि संघाच्या विजयात मोलाचे योगदान दिले.

हेही वाचा – MI vs RR : ‘आम्ही लढत राहू आणि पुढे…’, सलग तिसऱ्या पराभवानंतर हार्दिक पंड्याची भावनिक पोस्ट व्हायरल

या यादीत शेवटचे नाव युवा अभिषेक शर्माचे आहे. केकेआरविरुद्धच्या सामन्यात त्याने तुफानी फलंदाजी करत हैदराबादला शानदार सुरुवात करून दिली. सलामीच्या फलंदाजाने अवघ्या १९ चेंडूंत ४ चौकार आणि २ षटकारांसह ३२ धावा केल्या आणि संघाला २०० च्या पुढे नेण्यात मोलाचे योगदान दिले. पण केकेआरने अभिषेकची खेळी व्यर्थ ठरवत उत्कृष्ट विजयाची नोंद केली.