Rajasthan Royals vs Mumbai Indians Highlights: मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात राजस्थानने घरच्या मैदानावर चॅम्पियन संघाचा तब्बल ९ विकेट्सने पराभव केला. पंड्याच्या नेतृत्त्वाखालील मुंबई संघाचा हा ८ सामन्यांतील ५वा पराभव आहे. संघाचे ६ गुण असून ते सध्या ७व्या क्रमांकावर आहेत. तर दुसरीकडे, राजस्थान रॉयल्स १४ गुणांसह अव्वल स्थानावर आहे.यशस्वीचे शतक आणि संदीप शर्माचे पंचक यासह राजस्थानने यंदाच्या मोसमात मुंबईवर दुसऱ्यांदा विजय मिळवला आहे. ९ विकेट्स आणि ८ चेंडू राखून झालेल्या पराभवानंतरही पंड्याने सामन्यानंतर संघाच्या चुका, समस्या आणि स्वतचा फॉर्म यावर काहीच न बोलता वरवरचे वक्तव्य केले. या सामन्यानंतर डेल स्टेनने नाव घेता पंड्याचे तिखट शब्दात कान टोचले आहेत.

टूर्नामेंट सुरू झाल्यापासूनच हार्दिक हा आयपीएलमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार असलेल्या पंड्याचा खराब फॉर्म हे MI च्या IPL मधील खराब कामगिरीचे एक कारण आहे. राजस्थानविरुद्ध, मैदानातही हार्दिक बॅट आणि बॉलसह पुन्हा अपयशी ठरला. हार्दिकने सामन्यानंतर बोलताना पराभवाचे कारण म्हणून संघाच्या फिनिशिंगला जबाबदार धरले आणि सांगितले की संघाने १०-१५ धावा कमी केल्या.

सामन्यानंतर वक्तव्य करताना पंड्या म्हणाला, “आम्ही स्वतःला लवकर अडचणीत आणले. तिलक आणि नेहलने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ती कौतुकास्पद आहे. मला वाटत नाही की आम्ही दोन विकेट लवकर गमावल्या. विकेट गमावल्यानंतरही आम्हाला हेच वाटले होते की आम्ही १८० पर्यंत पोहोचू. आम्ही शेवट चांगला करू शकलो नाही. त्यामुळे १०-१५ धावा कमी पडल्या. आम्ही पॉवरप्लेमध्येच खूप धावा दिल्या, स्टंपवर सातत्याने मारा करायला हवा होता. क्षेत्ररक्षणातही आज आमचा चांगला दिवस नव्हता.”

पुढे बोलताना पंड्या म्हणाला, “प्रत्येकाला आपली भूमिका माहित नाही. त्यामुळे या चुका लक्षात घेऊन सुधारायला हव्या आणि त्या पुन्हा होणार नाही याचीही काळजी घ्यायला हवी. मला संघात सतत बदल करायला आवडत नाही. मला खेळाडूंच्या पाठीशी राहायला आवलते. नेहमी चांगले क्रिकेट खेळण्यावर आमचे लक्ष आहे,” असे पंड्या म्हणाला.

सरावाच्या प्रक्रियेवर भर देणं आणि मूलभूत गोष्टी नीट करणं, अशी वक्तव्य सध्या खेळाडू करत आहेत, पण त्यापेक्षा मनात जे असेल ते बिनधास्त बोलावं. असे स्टेनचे म्हणणे आहे. मॅचनंतरच्या सादरीकरणामध्ये एमआयच्या कर्णधाराने सावध भूमिका घेत वक्तव्य दिले, यानंतर स्टेनने एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर एक पोस्ट शेअर केली.

डेल स्टेनने पोस्टमध्ये लिहिले, “मी खरंच त्या दिवसाची वाट पाहत आहे, जेव्हा खेळाडूंना जे वाटतं ते प्रामाणिकपणे सांगतील. पण सध्या सगळे सावध भूमिका घेत बोलताना दिसत आहेत; पुढचा सामना हरणार, हसणार आणि पुन्ही तीच वायफळ बडबड करत वक्तव्य देणार.”

पावसाने सामन्यात व्यत्या आणल्यानंतरही राजस्थानच्या फटकेबाजीमध्ये बदल झाला नाही आणि मुंबई इंडियन्सने दिलेले १८० धावांचे लक्ष्य १८.४ षटकांत पूर्ण करण्यात राजस्थानने घरच्या मैदानावर विजय मिळवला.