IPL 2024, Mumbai Indians vs Chennai Super Kings: आयपीएल २०२४ साठी मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हार्दिक पंड्याला दिल्यापासूनच त्याला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागत आहे. पंड्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबईला यंदाच्या मोसमातील चौथा पराभव पत्करावा लागला. चेन्नई सुपर किंग्सने मुंबईचा वानखेडेवर २० धावांनी पराभव केला. या सामन्यानंतर पुन्हा एकदा हार्दिक सर्वांच्या निशाण्यावर आहे. मुंबई संघाचा फलंदाजी प्रशिक्षक असलेला कायरन पोलार्डने पंड्याला पाठिंबा देत त्याला ट्रोल करणाऱ्यांना सुनावले आहे.

– quiz

चेन्नईविरूद्धच्या सामन्यात हार्दिक पांड्याने चेन्नई सुपर किंग्जच्या डावातील शेवटचे षटक टाकले होते. महेंद्रसिंह धोनीने या षटकातील शेवटच्या ४ चेंडूंवर २० धावा केल्या होत्या आणि त्यामुळेच सामन्याला कलाटणी मिळाली. फलंदाजी करतानाही रोहितने शतकी खेळी करत एकट्याने संघाचा डाव उचलून धरला होता. झटपट दोन विकेट्स गमावल्यानंतर रोहित आणि तिलकने चांगली भागीदारी केली. पण तिलक बाद झाल्यावर आलेला हार्दिक रोहितसोबत भागदारी रचत संघाला विजयाजवळ नेईल असे वाटले होते, पण पांड्या ६ चेंडूत ४ धावा करून बाद झाला. तेव्हापासून त्याच्या कर्णधारपदावर आणि खेळावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

पोलार्डकडून हार्दिकची पाठराखण

मुंबई इंडियन्सचे फलंदाजी प्रशिक्षक पोलार्डने हार्दिकबद्दल सांगितले की, “एखाद्याला लक्ष्य करून त्याला सातत्याने नाव ठेवण्याच्या प्रकाराने मी कंटाळलो आहे; क्रिकेट हा एक सांघिक खेळ आहे. हार्दिक एक असा खेळाडू आहे जो पुढील ६ आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत देशासाठी खेळणार आहे आणि आपण तेव्हा त्याला पाठिंबा देणार आहोत आणि त्याने चांगली कामगिरी करावी अशी प्रत्येकाची इच्छा असणार आहे. आता वेळ आली आहे की आपण हार्दिकच्या चुका दाखवण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन देण्याची आणि भारताच्या या अष्टपैलू खेळाडूकडून आपल्याला एखादी सर्वोत्तम कामगिरी पाहायला मिळते का हे पाहण्याची. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी या तिन्ही गोष्टी तो करू शकतो आणि हा त्याचा एक्स फॅक्टर आहे. मला खात्री आहे जेव्हा तो चांगली कामगिरी करत सर्वांपेक्षा वरचढ ठरेल तेव्हा प्रत्येकाला मी त्याचे कौतुक करताना पाहीन.”

पोलार्डने याव्यतिरिक्त पंड्या एक खेळाडू म्हणून चांगली कामगिरी करण्याचा कसा प्रयत्न करत आहे याबद्दल सांगितले. तो म्हणाला, “खेळाडू म्हणून तुमचा विकास व्हायला हवा, जेव्हा तुम्ही तरुण असता तेव्हा तुम्ही ठरलेल्या पद्धतीने काम करता. तुम्हाला जसजसा अनुभव येतो तसतसे जबाबदारी स्वीकारता.” हार्दिक पंड्याला रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील मुंबई इंडियन्सची कामगिरी जशी होती ती कायम राखण्यासाठी झगडावे लागत आहे. यामुळे त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, पण मुंबई इंडियन्सचा माजी फलंदाज कायरॉन पोलार्डने त्याला पाठिंबा दर्शवत आहे.