IPL 2025 Awards List: तब्बल १८ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अखेर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू अर्थात RCB नं आयपीएल विजेतेपदावर नाव कोरलं आणि तमाम क्रिकेटचाहत्यांच्या भावना अनावर झाल्या. खुद्द किंग कोहलीही भर मैदानात ओक्साबोक्शी रडू लागला. मंगळवारी रात्री अहमदाबादमधल्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरचं संपूर्ण वातावरण आरसीबीमय आणि त्याहून अधिक विराटमय झालंय होतं. विराट कोहलीसाठीच आम्ही आयपीएल जिंकणार हे बंगळुरूच्या कर्णधारासह प्रत्येक खेळाडूनं म्हटलं होतं. विजेतेपदासह आरसीबीच्या खात्यात आणखीही अनेक पुरस्कार जमा झाले आहेत!
IPL 2025 Awards ची संपूर्ण यादी…
विजेते – रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
उपविजेता संघ – पंजाब किंग्ज<br>उदयोन्मुख खेळाडू – साई सुदर्शन (GT)
अंतिम सामना प्लेयर ऑफ द मॅच – क्रुणाल पांड्या (RCB)
अंतिम सामना स्ट्रायकर ऑफ द मॅच – जितेश शर्मा (RCB)
सुपर स्ट्रायकर ऑफ द सीझन – वैभव सूर्यवंशी (RR)
फँटसी किंग ऑफ द सीझन – साई सुदर्शन (GT)
पर्पल कॅप (सर्वाधिक विकेट) – प्रसिध कृष्णा (PBKS, २५ विकेट)
ऑरेंज कॅप (सर्वाधिक धावा) – साई सुदर्शन (७५९ धावा, GT)
सुपर सिक्सेस ऑफ द सीझन – निकोलस पूरन (LSG)
ऑन द गो फोर्स ऑफ द सीझन – साई सुदर्शन (८८ चौकार, GT)
सीझनमधील सर्वाधिक डॉट बॉल्स – मोहम्मद सिराज (GT)
कॅच ऑफ द सीझन – कमिंदू मेंडिस (SRH)
मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर – सूर्यकुमार यादव (MI)
फेअरप्ले अवॉर्ड – चेन्नई सुपर
सर्वोत्तम खेळपट्टी आणि मैदान – दिल्ली (डीडीसीए)
RCB पहिल्यांदाच विजयी!
मंगळवारी रात्री कर्नाटकमध्ये अक्षरश: दिवाळी साजरी झाली. आयपीएलच्या अंतिम सामन्यात कधीही विजेतेपद न मिळवलेले दोन संघ खेळत होते. त्यामुळे यंदा आयपीएलला नवा विजेता मिळणार यावर शिक्कामोर्तब झालं होतं. पंजाब किंग्जनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. आरसीबी २०० धावांचा टप्पा सहज पार करेल असं वाटत असतानाच शेवटच्या तीन षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी टिच्चून गोलंदाजी केली आणि आरसीबीला १९० धावांवर रोखण्यात PBKS ला यश आलं.
आयपीएलच्या विजेतेपदासाठी १९१ धावांचं लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या पंजाब किंग्जची सुरुवात चांगली झाली. पाचव्या षटकापर्यंत जवळपास १० च्या सरासरीने दोन्ही सलामीवीरांनी धावा कुटल्या. पण पाचव्या षटकात भरवशाच्या जॉश हेझलवूडनं आरसीबीला पहिली विकेट मिळवून दिली. फिल सॉल्टनं प्रियांश आर्याचा सीमारेषेवर अफलातून झेल टिपला आणि पंजाबच्या घसरगुंडीला सुरुवात झाली. तरीदेखील पंजाबनं हिकमती खेळी करत शेवटच्या षटकापर्यंत सामना नेला. शेवटच्या षटकात २९ धावांची गरज असताना हेझलवूडकडे कर्णधार रजत पाटीदारनं चेंडू सोपवला. पहिले दोन चेंडू निर्धाव गेल्यानंतर पुढे शशांकनं तीन षटकार आणि एक चौकार लगावला. पण तोपर्यंत आरसीबीच्या विजयावर शिक्कामोर्तब झालं होतं. आरसीबीनं ६ धावांनी आयपीएलचा अंतिम सामना जिंकला.