IPL 2025 Playoff Qualification Scenario: आयपीएल २०२५ मधील ५५वा सामना सनरायझर्स हैदराबाद वि. दिल्ली कॅपिटल्स संघांमध्ये खेळवण्यात आला. हा सामना हैदराबादच्या राजील गांधी स्टेडियममध्ये झाला. पण पावसामुळे हा सामना पूर्ण होऊ शकला नाही आणि सामना रद्द करण्यात आला. यासह दोन्ही संघांना १-१ गुण देण्यात आला आहे. यासह सनरायझर्स हैदराबादचा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. त्यामुळे ७ संघांसाठी प्लेऑफचं समीकरण बदललं आहे.
दिल्ली कॅपिटल्सने या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अवघ्या १३३ धावा केल्या होत्या. सनरायझर्स हैदराबाद संघासाठी हा करो या मरो सामना होता. या सामन्यात हैदराबादने उत्कृष्ट सुरूवात करत दिल्लीचे पॉवरप्लेमध्ये ४ विकेट्स घेतले आणि फलंदाजांना फार काळ मैदानावर टिकू दिलं नाही. यासह हैदराबादसमोर विजयासाठी १३४ धावांचं लक्ष्य होतं. पण पहिला डाव संपताच पावसाला सुरूवात झाली आणि परिणामी ओल्या आऊटफिल्डमुळे सामना रद्द करण्यात आला.
सनरायझर्स हैदराबादचा संघ स्पर्धेतून बाहेर झाल्याने उर्वरित सात संघांमध्ये प्लेऑफच्या ४ जागांसाठी रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. फार मोठी धावसंख्या न उभारल्याने दिल्लीला पावसामुळे एक गुण गिफ्ट मिळाला आहे. पण आता गुणतालिकेत काय बदल झाला आहे आणि समीकरण कसं बदललं आहे पाहूया.
आयपीएल २०२५ मधील सर्व संघांसाठी प्लेऑफचं समीकरण (IPL 2025 Playoff Qualification Scenario for All Teams)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB)
आरसीबीचा संघ ११ सामन्यांमध्ये सर्वाधिक १६ गुणांसह पहिल्या स्थानी आहे. संघाचे अजून तीन सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये त्यांना प्लेऑफकरता पात्र ठरण्यासाठी कमीत कमी एक सामना जिंकायचा आहे. तिन्ही सामने जिंकल्यात संघ टॉप-२ मध्ये जागा निश्चित करेल.
पंजाब किंग्स (PBKS)
पंजाबचा संघ ११ सामन्यांमध्ये सर्वाधिक १५ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. पावसामुळे केकेआरविरूद्ध सामना रद्द झाल्याने संघाचे गुण विषम संख्येत आहेत. संघाचे अजून तीन सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये त्यांना प्लेऑफकरता पात्र ठरण्यासाठी कमीत कमी एक सामना जिंकायचा आहे. तिन्ही सामने जिंकल्यास संघ टॉप-२ मध्ये जागा निश्चित करेल.
मुंबई इंडियन्स (MI)
मुंबई इंडियन्सचा संघ ११ सामन्यांमध्ये सर्वाधिक १४ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे. संघाचे अजून तीन सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये त्यांना प्लेऑफकरता पात्र ठरण्यासाठी दोन सामने जिंकायचे आहेत. तिन्ही सामने जिंकल्यास संघ टॉप-२ मध्ये जागा निश्चित करेल.
गुजरात टायटन्स (GT)
गुजरातचा संघ १० सामन्यांमध्ये सर्वाधिक १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. संघाचे अजून चार सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये त्यांना प्लेऑफकरता पात्र ठरण्यासाठी कमीत कमी २ सामन्यांमध्ये विजय मिळवावा लागणार आहे. सर्व सामने जिंकल्यास संघ टॉप-२ मध्ये जागा निश्चित करेल.
दिल्ली कॅपिटल्स (DC)
दिल्लीचा संघ ११ सामन्यांमध्ये १३ गुणांसह पाचव्या स्थानी पोहोचला आहे. संघाला उर्वरित तीन सामन्यांपैकी २ सामने काही करून जिंकावे लागणार आहेत. सर्व तिन्ही सामने जिंकल्यास संघ टॉप-२ मध्ये राहिल. संघाचे पुढचे तिन्ही सामने पंजाब, गुजरात आणि मुंबईविरूद्ध आहेत जे संघ टेबल टॉपर आहेत.
कोलकाता नाईट रायडर्स (KKR)
केकेआरचा संघ ११ सामन्यांमध्ये सर्वाधिक ११ गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. संघाचे अजून तीन सामने शिल्लक आहेत, ज्यामध्ये त्यांना प्लेऑफकरता पात्र ठरण्यासाठी सर्व सामने जिंकावे लागतील आणि दरम्यान नेट रन रेटही सुधारावा लागेल. संघाने एकही सामना गमावला तर ते थेट स्पर्धेबाहेर होतील.
लखनौ सुपर जायंट्स (LSG)
लखनौचा संघ चांगल्या सुरूवातीनंतर मागे पडला आहे. संघ ११ सामन्यांमध्ये १० गुणांसह सातव्या स्थानी आहे. लखनौला उर्वरित तिन्ही सामने जिंकून इतर संघांच्या निकालांवर अवलंबून राहावे लागणार आहे. संघाचा नेट रन रेट ऋणमध्ये असल्याने स्पर्धेबाहेर पडण्याची शक्यता जास्त आहे.