IPL 2025 Playoffs Schedule Decided: इंडियन प्रीमियर लीग २०२५ चा लीग टप्पा संपला आहे आणि आता क्रिकेटप्रेमींच्या नजरा प्लेऑफच्या रोमांचक सामन्यांवर असणार आहेत. पंजाब किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्लेऑफमध्ये स्थान मिळवले होते. पण प्लेऑफमधील क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामने कोण खेळणार हे अखेरच्या लीग सामन्यापर्यंत ठरलं नव्हतं.
आता आरसीबीने त्यांच्या लीग टप्प्यातील अखेरच्या सामन्यात लखनौचा पराभव करून प्लेऑफमधील संघांचं चित्र स्पष्ट केलं आहे. यंदाच्या हंगामातील उत्कृष्ट कामगिरीनंतर पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या दोन संघांनी टॉप-२ मध्ये स्थान मिळवलं आहे.
आयपीएल २०२५ च्या लीग टप्प्यातील सामने संपल्यानंतर पंजाब किंग्सचा संघ १९ गुणांसह आणि ०.३७२ च्या उत्कृष्ट नेट रन रेटसह पहिल्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १९ गुणांसह ०.३०१ च्या नेट रन रेटसह दुसऱ्या स्थानी आहे. तर गुजरात टायटन्सचा संघ १८ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे आणि मुंबई इंडियन्सचा संघ १६ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.
IPL 2025 च्या प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना कोणत्या संघांमध्ये खेळवला जाणार?
आयपीएल २०२५ गुणतालिकेप्रमाणे प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये होईल. या सामन्यातील विजेता संघ थेट अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. तर पराभूत संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी एक अजून संधी मिळेल. पहिला क्वालिफायर सामना २९ मे रोजी संध्याकाळी ७.३० वाजता खेळवला जाईल. तर ७ वाजता नाणेफेक होईल. तर हा सामना मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र स्टेडिमवर खेळवला जाईल.
IPL 2025 च्या प्लेऑफमधील एलिमिनेटर सामन्यात कोणते संघ भिडणार?
आयपीएल २०२५ मधील एलिमिनेटर सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात होईल. या सामन्यातील पराभूत संघ स्पर्धेतून बाहेर पडेल. तर विजेत्या संघाला अंतिम फेरी गाठण्यासाठी क्वालिफायर-२ खेळावी लागेल. ज्यामध्ये या संघाचा सामना क्वालिफायर-१ मधील पराभूत संघाशी होईल. एलिमिनेटर सामना ३० मे रोजी मुल्लानपूरच्या महाराजा यादवेंद्र स्टेडिमवर खेळवला जाईल आणि ७.३० वाजता सुरू होईल. तर नाणेफेक ७ वाजता होईल.
क्वालिफायर १ चा पराभूत संघ आणि एलिमिनेटरचा विजेता संघ दुसरा क्वालिफायर सामना खेळतील. हा दुसरा क्वालिफायर सामना १ जूनला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल. तर क्वालिफायर-१ आणि क्वालिफायर-२ चा विजेता संघ अंतिम फेरीत खेळणार आहे. अंतिम सामना ३ जून रोजी होईल.