IPL 2025 Playoffs Top-2 Race MI GT PBKS RCB: आयपीएल २०२५ च्या प्लेऑफसाठीचे ४ संघ आधीच ठरले आहेत. येत्या २९ मे पासून प्लेऑफचे सामने सुरू होणार आहेत. पण तत्पूर्वी क्वालिफायर-१ आणि एलिमिनेटर सामने कोण खेळणार हे अद्याप निश्चित झालेलं नाही. प्रत्येक सामन्यानंतर हे समीकरण बदलत आहे. गुजरात टायटन्सचा संघाला चेन्नईने पराभवाचा मोठा धक्का दिला आहे. गुजरातच्या पराभवामुळे त्यांचं टॉप-२ मधील स्थान धोक्यात आलं आहे.
गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स हे चारही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. यापैकी टॉप-३ संघ असलेल्या गुजरात, पंजाब, आरसीबी यांनी त्यांचे सामने गमावले आहेत. गुजरातच्या संघाचे १४ सामने पूर्ण झाले आहेत आणि संघ पहिल्या स्थानी आहे. पण इतर तिन्ही संघांचे एकेक सामने अद्याप बाकी आहेत.
गुजरातचा संघ १८ गुणांसह आणि ०.२५४ च्या नेट रन रेटसह पहिल्या स्थानी आहे. तर पंजाबचा संघ १७ गुणांसह ०.३२७ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. यानंतर आरसीबी १७ गुणांसह ०.२५५ गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे आणि मुंबईचा संघ १६ गुणांसह १.२९२ च्या कमालीच्या नेट रन रेटसह चौथ्या स्थानी आहे.
गुजरातचा संघ आता १८ गुणांवर राहणार आहे. तर इतर तिन्ही संघांना आपल्या गुणांमध्ये वाढ करत टॉप-२ स्थान गाठण्याची संधी आहे. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यातील सामना खूप महत्त्वाचा असणार आहे. या सामन्यातील विजेता संघ टॉप-२ मध्ये जाऊ शकतो. मुंबईचा संघ जिंकला तर चांगल्या नेट रन रेटमुळे थेट पहिल्या स्थानी पोहोचू शकतो. तर पंजाबचा संघ जिंकल्यास तो देखील पहिल्या स्थानी पोहोचू शकतो.
गुजरातच्या पराभवानंतर टॉप-२ साठी कसं असणार समीकरण?
मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स यांच्यातील विजेता संघ टॉप-२ मध्ये जागा निश्चित करणार.
आरसीबीने अखेरच्या सामन्यात लखनौ सुपर जायंट्सचा पराभव केल्यास टॉप-२ मध्ये राहणार.
लखनौने आरसीबीचा पराभव केल्यास गुजरात टायटन्स टॉप-२ मध्ये राहणार.