IPL 2025 PBKS vs MI To Shift: पहलगाममधील पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतला आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ले केले. यानंतर दोन्ही देशांमध्ये तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम इंडियन प्रीमियर लीगवरही दिसून येत आहे. वृत्तानुसार, सीमेवरील नाजूक परिस्थिती लक्षात घेता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने धरमशाला येथे होणारा सामना हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
११ मे रोजी होणाऱ्या पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाब आणि मुंबई यांच्यातील सामना हिमाचल प्रदेशातील धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. परंतु भारतीय सैन्याने केलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे.
पाकिस्तानकडून प्रत्युत्तर म्हणून हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन, केंद्र सरकारने सीमेलगतच्या राज्यांचे आणि शहरांचे विमानतळ पुढील काही तासांसाठी बंद केले आहेत. या विमानतळांवरून सर्व प्रकारची नागरी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.
पाकिस्तानकडून प्रत्युत्तर म्हणून हल्ल्याचा धोका लक्षात घेऊन, केंद्र सरकारने सीमेलगतच्या राज्यांचे आणि शहरांचे विमानतळ पुढील काही तासांसाठी बंद केले आहेत. या विमानतळांवरून सर्व प्रकारची नागरी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. त्यामुळे आयपीएल सामने खेळवले जाणार की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
सर्वांचे लक्ष विशेषतः धरमशाला येथे होणाऱ्या सामन्यांवर आहे, कारण हे शहर आंतरराष्ट्रीय सीमेपासून फक्त १५० किलोमीटर अंतरावर आहे. दरम्यान धरमशाला विमानतळ देखील बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पंजाब किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्याचे ठिकाण बदलून सामना मुंबईत हलवण्यात येणार असल्याची बातमी रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.
क्रिकबझच्या अहवालानुसार, सध्याची परिस्थिती लक्षात घेता, मुंबई इंडियन्सचा धरमशाला दौरा सध्यासाठी पुढे ढकलण्यात आला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्त्वाखालील संघ ७ मे रोजी धरमशालासाठी रवाना होणार होता पण आता तो पुढे ढकलण्यात आला आहे.
पंजाब किंग्स वि. दिल्ली कॅपिटल्स सामना खेळवला जाणार की नाही?
पंजाब आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना गुरुवार, ८ मे रोजी धरमशाला येथे खेळवला जाणार आहे. परंतु सध्या हा सामना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचे कारण म्हणजे दोन्ही संघ आधीच धरमशालामध्ये उपस्थित आहेत. भारतीय बोर्ड देखील केंद्र सरकारशी सतत संपर्कात आहे आणि अशा परिस्थितीत, जर या सामन्याला धोका निर्माण झाला तर तो पुढे ढकलला जाऊ शकतो आणि इतर ठिकाणी खेळवला जाऊ शकतो.