What is The Turning Point of Mumbai Indians Win: मुंबई इंडियन्सने एलिमिनेटर सामन्यात गुजरात टायटन्सवर शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने गुजरातवर २० धावांनी विजय मिळवत मुंबईने यंदाच्या प्लेऑफमध्ये क्वालिफायर -२ मध्ये धडक मारली आहे. मुंबई इंडियन्सच्या गोलंदाज-फलंदाजांनी या सामन्यात योगदान दिलं. पण जगातील उत्कृष्ट वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराहच्या एका यॉर्करने सामन्याचा रोख बदलला. बुमराहच्या त्या षटकातील एक चेंडू सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

मुंबईच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासह रोहित शर्मा आणि जॉनी बेयरस्टो यांनी अर्धशतकी भागीदारी रचत मुंबईच्या मोठ्या धावसंख्येचा पाया रचला. जॉनी बेयरस्टो ४७ धावा करत बाद झाला. तर रोहित शर्माने ५० चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह ८० धावांची खेळी केली. याशिवाय मुंबईच्या इतर सर्व फलंदाजांनीही यामध्ये धावांचं योगदान देत संघाला २२८ धावांचा टप्पा गाठून दिला.

प्रत्युत्तरात गुजरात टायटन्सकडून साई सुदर्शन आणि शुबमन गिलची जोडी उतरली. ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात गिलला पायचीत करत माघारी धाडलं. पण यानंतर कुसल मेंडिस आणि साई सुदर्शनने मुंबईच्या गोलंदाजांची धुलाई करत झटपट धावा करायला सुरूवात केली. मेंडिस २० धावा करत हिट विकेटवर बाद झाला. यानंतर साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदरच्या जोडीने गोलंदाजांवर हल्ला बोल केला.

दोघे खेळाडू १० ते ११ च्या रनरेटने खोऱ्याने धावा करत होते. प्रत्येक गोलंदाजाविरूद्ध आक्रमक पवित्र्याने फटकेबाजी करत होते. साई सुदर्शन ७९ धावा तर वॉशिंग्टन ४८ धावांवर खेळत होता आणि मुंबई इंडियन्सच्या धावांच्या बरोबरी सामना सुरू होता. तितक्यात जसप्रीत बुमराह १४ वे षटक टाकण्यासाठी आला.

बुमराहचे षटक म्हणजे विकेटची हमी हे जणू समीकरणचं झालं आहे. बुमराहने पहिल्या दोन चेंडूवर १-१ धाव दिली. तिसरा चेंडू यॉर्कर टाकत साईने एक धाव घेत सुंदरला स्ट्राईक दिली. बुमराहने पुन्हा चौथ्या चेंडूवर असा परफेक्ट यॉर्कर टाकला की, सुंदर चकित झाला आणि चेंडू मारायला जाण्याच्या नादात त्याच्या दोन्ही पायांच्या मधून चेंडू जाऊन थेट स्टम्पवर आदळला आणि सुंदरही जमिनीवर कोसळला. बुमराहच्या या यॉर्करने सामन्याचा रोख बदलला. त्या षटकात त्याने विकेट घेत फक्त ४ धावा दिल्या आणि गुजरातच्या धावांना ब्रेक लावला.

जसप्रीत बुमराहने विकेट घेतल्यानंतर गुजरातच्या धावांना थोडा ब्रेक लागला. अश्वनी कुमारने पुढचं शानदार षटक टाकत तो दबाव कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. यानंतर १६व्या षटकात पदार्पणवीर रिचर्ड ग्लीसनने साई सुदर्शनला क्लीन बोल्ड करत मुंबईच्या विजयामध्ये मोठं योगदान दिलं. यानंतर अखेरच्या षटकांमध्ये मुंबईने चांगली गोलंदाजी करत अखेरीस सामना २० धावांनी जिंकला.