IPL 2023, MI vs RCB Match Updates: आयपीएल २०२३ चा ५४ वा सामना मंगळवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात खेळल्या गेलेल्या या सामन्यात एमआयने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने २० षटकांत ६ गडी गमावून १९९ धावा केल्या. कर्णधार फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी शानदार भागीदारी केली. प्रत्युत्तरात मुंबईने १६.३ षटकांत ४ गडी गमावून २०० धावा केल्या आणि सामना ६ गडी राखून जिंकला.
मुंबईसाठी चांगली सुरुवात झाली –
२०० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात चांगली झाली. इशान किशनने येताच मोठे फटके मारण्यास सुरुवात केली, तर दुसऱ्या टोकाला रोहित शर्मा शांत राहिला. ५व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर इशान किशन २१ चेंडूत ४२ धावा करून झेलबाद झाला. त्याच षटकातील शेवटच्या चेंडूवर वानिंदू हसरंगाने रोहित शर्माला एलबीडब्ल्यू आऊट केले. मुंबईच्या कर्णधाराने ८ चेंडूत ७ धावा केल्या. यादरम्यान त्याने एक चौकार मारला.
सूर्याची वादळी खेळी –
१६व्या षटकातील चौथ्या चेंडूवर मुंबईला तिसरा धक्का बसला. वेगवान फलंदाजी करणारा सूर्यकुमार यादव ३५ चेंडूत ८३ धावांची खेळी करून झेलबाद झाला. या खेळीत स्कायने ७ चौकार आणि ६ शानदार षटकार ठोकले. पुढच्याच चेंडूवर टीम डेव्हिडनेही झेलबाद झाला. त्याचे खातेही उघडले नाही. नेहल वढेराने ३४ चेंडूत ५२ धावा केल्यानंतर नाबाद राहिला आणि कॅमेरून ग्रीनने २ चेंडूत २ धावा केल्या.
विराटने फक्त एक धाव काढली –
आरसीबी प्रथम फलंदाजीला उतरलेल्या आरसीबीची सुरुवात खराब झाली. पहिल्याच षटकातील ५व्या चेंडूवर जेसन बेहरेनडॉर्फने विराट कोहलीला इशान किशनकरवी झेलबाद केले. विराट कोहलीला ४ चेंडूत फक्त १ धाव करता आली. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला अनुज रावतही अपयशी ठरला. तिसऱ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर बेहरेनडॉर्फने त्याला कॅमेरून ग्रीनकडे झेलबाद केले. रावतने ४ चेंडूत ६ धावा केल्या. फाफ डुप्लेसिस आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी १२० धावांची भागीदारी केली.
फॅफ-मॅक्सवेलची शतकी भागीदारी –
१३व्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर बेहरेनडॉर्फने मुंबईला तिसरे यश मिळवून दिले. वेगवान फलंदाजी करणाऱ्या मॅक्सवेलने नेहल वढेराकडे झेल सोपवला. मॅक्सीने ३३ चेंडूत ६८ धावांची शानदार खेळी केली. १४व्या षटकात आरसीबीची चौथी विकेट पडली. महिपाल लोमरोरला कुमार कार्तिकेयने बाद केले. लोमररने आज 3 चेंडूत १ धावा काढली. १५ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर बंगळुरूची ५वी विकेट पडली. कॅमेरून ग्रीनने कर्णधार फॅफला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. फॅफने ४१ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ६५ धावा केल्या. १९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर दिनेश कार्तिक झेलबाद झाला. ख्रिस जॉर्डनच्या चेंडूवर नेहल वढेराने त्याचा झेल टिपला. यष्टीरक्षक फलंदाजाने १८ चेंडूत ३० धावा केल्या.