3 History Sheeters Arrested From Hotel Where RCB Team Stayed: इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १६व्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) संघाच्या खेळाडूंच्या सुरक्षेत मोठी चूक झाली आहे. पंजाब किंग्ज (पीबीकेएस) विरुद्ध खेळण्यासाठी मोहालीला पोहोचलेल्या आरसीबी संघातील खेळाडूंच्या चंदीगडमधील हॉटेलमधून पोलिसांनी ३ हिस्ट्रीशीटर्सना अटक केली. या तिघांवर खुनासह अनेक गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल आहेत.
२० एप्रिल रोजी पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात मोहालीच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर सामना झाला. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, पोलिसांनी अटक केलेल्या हिस्ट्रीशीटर्सची चौकशी केली असता, त्यांनी सांगितले की, त्यांना खेळाडूंसोबत फोटो काढायचे होते. आयटी पार्क पोलिस स्टेशनचे एसएचओ रोहताश यादव आता सट्टेबाजीच्या दृष्टीकोनातूनही या प्रकरणाचा तपास करत आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेल्या तीन गुन्हेगारांवर गोळीबारासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. हॉटेलमध्ये राहणाऱ्या पाहुण्यांची यादी तपासल्यानंतर पोलिसांना या तिघांची माहिती मिळाली, त्यानंतर प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून या तिघांनाही आयटी पार्क पोलिसांनी अटक केली.
हेही वाचा – IPL 2023: आयपीएलमधील धोनीच्या ‘या’ विक्रमाच्या जवळपासही कोणी नाही, नेमका कोणता विक्रम? जाणून घ्या
हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर थांबली होती आरसीबी टीम –
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील खेळाडूंना चंदीगडमधील हॉटेलच्या पाचव्या मजल्यावर राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. या तिघांना अटक केल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण हॉटेलमध्ये शोधमोहीम राबवली, ज्यामध्ये गुन्हेगारांकडून एक कारही जप्त करण्यात आली. मात्र, त्यांच्या हॉटेलच्या खोल्यांमधून काहीही सापडले नाही. हिस्ट्री शीटर्सनी हॉटेलच्या तिसऱ्या मजल्यावर त्यांची खोली बुक केली होती, तिथून पोलिसांनी त्यांना अटक केली.
आरसीबीने पंजाबचा २४ धावांनी पराभव केला –
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने पंजाब किंग्जचा २४ धावांनी पराभव केला. या सामन्यात आरसीबीने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करत चांगली सुरुवात केली. कोहली आणि प्लेसिसने १३७ धावांची भागीदारी केली. दोघांच्या अर्धशतकांमुळे आरसीबीने चार गडी गमावून १७४ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ १८.२ षटकांत केवळ १५० धावाच करू शकला आणि सामना २४ धावांनी गमावला. पंजाबकडून प्रभसिमरन सिंगने सर्वाधिक खेळी केली. त्याचवेळी जितेश शर्माने ४१ धावांची खेळी केली.
हेही वाचा – VIDEO: हेनरिक क्लासेनवर संतापला जडेजा, विकेट घेतल्यानंतर ‘असा’ काढला राग
आरसीबीचा संघ सहा गुणांसह पाचव्या स्थानावर –
पंजाबकडून हरप्रीत ब्रारने दोन आणि अर्शदीप, नॅथन एलिसने प्रत्येकी एक बळी घेतला. सिराजने चार विकेट घेत आरसीबीसाठी महत्वाची भूमिका बजावली. हसरंगाला दोन, वेन पारनेल आणि हर्षल पटेलला प्रत्येकी एक विकेट मिळाली. या सामन्यातील विजयासह आरसीबीचा संघ सहा गुणांसह पाचव्या स्थानावर आला आहे. त्याचबरोबर पंजाबचा संघ सातव्या स्थानावर घसरला आहे. दोन्ही संघांचे सहा सामन्यांत सहा गुण आहेत.