RCB beat CSK by 2 Runs: आरसीबीने चेन्नई सुपर किंग्सचा अखेरच्या षटकात २ धावांनी पराभव करत थरारक विजय मिळवला. या विजयासह आरसीबीचे गुणतालिकेत १६ गुण झाले असून संघ पहिल्या स्थानी पोहोचला आहे. संघ अधिकृतपणे प्लेऑफसाठी पात्र ठरला नसला तरी आरसीबी प्लेऑफच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. स्पर्धेतून बाहेर पडलेल्या चेन्नईसाठी सर्व सामने प्रतिष्ठेची लढाई असणार आहेत. या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजांनी झुंज दिली खरी, पण संघाला विजय मात्र मिळवून देऊ शकले नाहीत. या विजयासह आरसीबीने आयपीएल इतिहासात प्रथमच चेन्नईचा एका सीझनमध्ये दोन वेळा पराभव केला आहे.

अखेरच्या षटकात आरसीबीला विजयासाठी १५ धावांची गरज होती. यश दयालकडे गोलंदाजी सोपवण्यात आली. यशने पहिल्या दोन चेंडूंवर १-१ धाव दिली. यानंतर तिसऱ्या चेंडूवर एमएस धोनीला एलबीडब्ल्यू बाद करत मोठी विकेट मिळवली. यानंतर चौथ्या चेंडूवर शिवम दुबेने येताच षटकार लगावला. याचबरोबर हा चेंडू नो बॉल ठरला. यशने सलग तीन चेंडू अचूक यॉर्कर टाकत दुबे आणि जडेजाला धावा काढण्याची संधी दिली नाही आणि संघाला २ धावांनी थरारक विजय मिळवून दिला.

आरसीबीने दिलेल्या २१४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नईने चांगली सुरूवात केली. शेख रशीद आणि आयुष म्हात्रेने चांगली सुरूवात केली. पण शेख रशीद लवकर झेलबाद झाला. यानंतर सॅम करनही झटपट बाद झाला. यानंतर रवींद्र जडेजा आणि आयुष म्हात्रेने १०० हून अधिक धावांची भागीदारी करत संघाला सामन्यात कायम ठेवलं. आयुष म्हात्रे ४८ चेंडूत ९ चौकार आणि ५ षटकारांसह ९४ धावा करत बाद झाला.

बेंगळुरूने पुन्हा एकदा घरच्या मैदानावर नाणेफेक गमावली आणि सलग पाचव्यांदा प्रथम फलंदाजी करावी लागली. पण कोहली आणि बेथलने धमाकेदार सुरुवात केली आणि १० षटकांत ९७ धावांची भागीदारी केली. बेथेलने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिले अर्धशतक झळकावले, तर कोहलीने हंगामातील त्याचे सातवे अर्धशतक झळकावले. १२ व्या षटकात कोहली बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला आणि मधल्या फळीतील फलंदाज मथिशा पाथिरानाचे बळी ठरले.

एकेकाळी बेंगळुरू १८ षटकांत फक्त १५९ धावांवर होता. पण रोमारियो शेफर्डने अद्भुत फलंदाजी केली आणि या हंगामात पहिल्यांदाच फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजच्या फलंदाजाने फक्त १४ चेंडूत ५३ धावा केल्या. आरसीबीने शेवटच्या २ षटकांत ५४ धावा केल्या, त्यापैकी ५२ धावा शेफर्डच्या होत्या.