आयपीएल २०२५च्या प्लेऑफमधील पहिला क्वालिफायर सामना जिंकत आरसीबीने थेट अंतिम फेरी गाठली आहे. पंजाब किंग्सविरूद्धच्या सामन्यात आरसीबीने एकतर्फी विजय मिळवत अवघ्या १० षटकांत सामना आपल्या नावे केला. आरसीबीचे गोलंदाज या सामन्याचे मॅचविनर ठरले. तर फलंदाजीत फिल सॉल्ट नाबाद ५६ धावांच्या खेळीच्या जोरावर संघाने विजय नोंदवला.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ चौथ्यांदा आयपीएल फायनलमध्ये पोहोचला आहे. याआधी आरसीबी २००९, २०११ आणि २०१६ मध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती. पण त्यांना जेतेपद पटकावता आलेले नाही. पण यंदा मात्र आरसीबी जेतेपद जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) मध्ये २०११ पासून प्लेऑफ सिस्टम सुरू करण्यात आली. ज्यामध्ये क्वालिफायर १, एलिमिनेटर, क्वालिफायर २ आणि अंतिम सामने खेळवले जातात. परंतु आयपीएलच्या इतिहासात पहिला क्वालिफायर सामना जिंकणाऱ्या संघांनी किती विजेतेपदे जिंकली आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?

यंदाच्या गुणतालिकेत पंजाब किंग्स पहिल्या स्थानी, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू दुसऱ्या स्थानी तर गुजरात टायटन्स तिसऱ्या आणि मुंबई इंडियन्स चौथ्या स्थानी आहेत. त्यामुळे पहिला क्वालिफायर सामना हा पंजाब किंग्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळवण्यात आला. हा पहिला क्वालिफायर सामना आरसीबीने सहज जिंकला. पहिला क्वालिफायर सामना जिंकताच आरसीबीचे जेतेपद जिंकण्याची शक्यता वाढली आहे.

पहिला क्वालिफायर जिंकणाऱ्या संघांनी किती वेळा जिंकलं आहे IPLचं जेतेपद?

२०११ पासून आतापर्यंत पहिला क्वालिफायर सामना ११ संघांनी जिंकला आहे. आयपीएलमध्ये प्लेऑफ प्रणाली सुरू होऊन १४ वर्षे झाली आहेत आणि या १४ वर्षांत, पहिला क्वालिफायर जिंकणाऱ्या संघाने ११ वेळा विजेतेपद जिंकले आहे. यावेळी पहिल्या क्वालिफायर सामन्याचा विजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू म्हणजेच आरसीबी आहे.

गुरुवार, २९ मे रोजी न्यू चंदीगडमधील मुल्लानपूर येथील क्वालिफायर १ मध्ये आरसीबीने पंजाब किंग्जचा ८ गडी राखून पराभव केला. या सामन्यात पंजाबचा संघ फक्त १०१ धावा करून सर्वबाद झाला. त्याच वेळी, आरसीबीने १० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर २ विकेट गमावून हे लक्ष्य गाठले आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम फेरीत पोहोचल्याने, आरसीबीची विजेतेपद जिंकण्याची शक्यता ७८ टक्क्यांहून अधिक वाढली आहे, कारण १४ पैकी ११ वेळा, पहिला क्वालिफायर सामना जिंकणाऱ्या संघांनी जेतेपद पटकावले आहे.

२०११ पासून आयपीएलमध्ये प्लेऑफ सामने खेळवले जात आहेत. २००८ ते २०१० पर्यंत, उपांत्य फेरीचे सामने खेळवले जात होते, परंतु २०११ पासून प्लेऑफमध्ये चार सामने खेळवण्याचा ट्रेंड सुरू झाला, ज्यामध्ये दोन क्वालिफायर, एक एलिमिनेटर आणि एक फायनल असे सामने होते. यापूर्वी दोन उपांत्य फेरी आणि एक अंतिम सामना खेळवण्यात आला होता. नवीन प्रणालीनुसार, आयपीएल पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघांना अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी दोन संधी मिळतात. आरसीबीने पहिला सामना जिंकण्याचे हेच कारण आहे.

क्वालिफायर-१ सामना जिंकण्याचे काय आहेत फायदे?

क्वालिफायर १ जिंकण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे संघाला थेट अंतिम फेरीत प्रवेश मिळतो आणि संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळण्यापासून वाचतो, कारण तिथून बाहेर पडण्याचा धोका असतो. आणखी एक फायदा म्हणजे क्वालिफायर १ आणि अंतिम सामना सहसा वेगवेगळ्या स्टेडियममध्ये खेळवला जातो. क्वालिफायर १ जिंकणाऱ्या संघासाठी याचा फायदा असा आहे की तो प्रथम तिथे पोहोचतो आणि चांगली तयारी करू करतो आणि त्यांना थोडी विश्रांती देखील मिळते, कारण क्वालिफायर १ आणि फायनलमध्ये दोन सामने खेळवले जातात, त्यापैकी एक एलिमिनेटर आणि दुसरा क्वालिफायर असतो.