Rishabh Pant took David Miler one handed catch video viral : आयसीसी टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचा यष्टिरक्षक कोण असेल, यावरून अनेक खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळत आहे. त्यांच्यामध्ये ऋषभ पंत मोठा दावेदार म्हणून उदयास येत आहे. दुखापतीनंतर शानदार पुनरागमन करणारा ऋषभ पंत शानदार फलंदाजी करताना दिसत आहे, तर तो विकेटच्या मागेही उत्कृष्ट क्षेत्ररक्षण करत आहे. त्याच्या अप्रतिम क्षेत्ररक्षणाची झलक गुजरात टायटन्सविरुद्धच्या सामन्यात पाहायला मिळाली. जिथे पंतने उत्कृष्ट डायव्हिंग मारत डेव्हिड मिलरचा झेल घेतल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डेव्हिड मिलर पाचव्या षटकात झाला झेलबाद –

हे दृश्य ५व्या षटकात दिसले. गुजरातचा डावखुरा फलंदाज डेव्हिड मिलर हा पाच चेंडूत दोन धावांवर खेळत असताना क्रीझवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होता. त्यामुळे मिलर गुजरातच्या बुडत्या नौकेला आधार देण्याचा प्रयत्न करेल, असे वाटत होते, पण यादरम्यान इशांत शर्माच्या शानदार गोलंदाजीने आणि ऋषभ पंतच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणाने त्याला मोठा धक्का दिला. इशांतचा हार्ड लेन्थचा चेंडू आत आला, ज्यावर डेव्हिड मिलर समतोल साधता आला नाही. त्यामुळे चेंडू त्याच्या बॅटची कडा घेऊन विकेटच्या मागे गेला. येथे तयार उभ्या असलेल्या ऋषभ पंतने डावीकडे डायव्हिंग केले आणि एका हाताने उत्कृष्ट झेल घेतला. हा झेल घेऊन ऋषभ पंतने सर्वांना चकित केले. ज्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून ऋषभवर कौतुकांचा वर्षाव होत आहे.

दिल्ली कॅपिटल्सला मिळा ९० धावांचे लक्ष्य –

सामन्याबद्दल, बोलायचे तर नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेला गुजरातचा संघ दिल्लीच्या गोलंदाजांपुढे १७.३ षटकांत ८९ धावांवर गारद झाला. गुजरात टायटन्सच्या डावात ८ फलंदाजांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. साई सुदर्शनने १२ आणि राहुल तेवतियाने १० धावांचे योगदान दिले. १५ व्या षटकापर्यंत गुजरात टायटन्सची धावसंख्या ८ गड्यांच्या मोबदल्यात ७८ धावा होती. पण राशिद खान भक्कम भिंतीसारखा क्रीजवर उभा राहिला. मात्र, तो पण ३१ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. गुजरातच्या डावात षटकार ठोकणारा राशिदद खान हा एकमेव फलंदाज होता. संथ खेळपट्टीवर झुंजत असताना, गुजरात टायटन्सचा डाव १८व्या षटकातच संपुष्टात आला, जेव्हा नूर अहमदला मुकेश कुमारने क्लीन बोल्ड केले.

हेही वाचा – ‘IPLमध्ये शिकण्यासारखे काहीच नाही…,’ मुस्तफिझूरला परत बोलावल्यानंतर BCB अध्यक्षांचे चकित करणारे वक्तव्य

दिल्लीच्या गोलंदाजीसमोर गुजरातचे फलंदाज –

आयपीएल २०२४ मध्ये आतापर्यंत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांची खूप धुलाई झाली होती, परंतु जीटी विरुद्धच्या सामन्यात प्रत्येकाने शानदार कामगिरी केली. मुकेश कुमारने ३, इशांत शर्मा आणि ट्रिस्टन स्टब्सने २, तर खलील अहमद आणि अक्षर पटेल यांनी आपापल्या षटकात प्रत्येकी एक विकेट घेतली. कुलदीप यादवला एकही विकेट घेता आली नसली, तरी त्याने ४ षटकांत केवळ १६ धावा देऊन गुजरातच्या फलंदाजांना सतत दबावाखाली ठेवले. या तगड्या गोलंदाजीमुळे त्याने गुजरातला पूर्ण २० षटकेही खेळू दिली नाहीत. आयपीएल २०२४ मध्ये खलील अहमदने आतापर्यंत २ मेडन षटके टाकली आहेत. तसेच सर्वाधिक मेडन षटके टाकण्याच्या बाबतीत तो पहिला क्रमांकावर आहे.