Vaibhav Suryavanshi and Rohit Sharma: मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सच्या सामन्यात मुंबईने एका मोठ्या विजयाची नोंद केली. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या संघाने २१८ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सच्या वैभव सूर्यवंशीकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. गुजरात टायटन्सविरुद्ध खेळलेल्या मागच्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीने ३५ चेंडूत खणखणीत शतक ठोकले होते. त्यामुळे जसप्रीत बुमराह, बोल्ट आणि दीपक चहर यांचा तो कसा सामना करणार? याची उत्सुकता होती. मात्र दोन चेंडू खेळून तो शून्यावर बाद झाला. निराशाजनक कामगिरी झाल्यामुळे वैभव सूर्यवंशी हिरमुसला होता. पण सामन्यानंतर रोहित शर्माने त्याच्याबरोबर केलेली कृती आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
गुजरात टायटन्सच्या सामन्यात तुफानी खेळी खेळल्यानंतर १४ वर्षांचा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी चर्चेत आहे. त्याच्याबद्दल क्रिकेटवर्तुळासह इतरही क्षेत्रात चर्चा होत आहे. आयपीएलमधील सर्वाधिक जलद शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला. त्यामुळे राजस्थान रॉयल्सच्या प्रत्येक सामन्यात त्याच्या खेळीकडे क्रिकटप्रेमीचे नक्कीच लक्ष असणार आहे.
गुरूवारी राजस्थानच्या घरच्या मैदानावर सामना असल्यामुळे संघाचे अनेक चाहते मैदानावर उपस्थित होते. मात्र वैभव सूर्यवंशीसह राजस्थानच्या एकाही फलंदाजाला समाधानकारक कामगिरी करता आली नाही. अवघ्या १६ षटकांत ११७ धावांवर राजस्थानचा संघ सर्वबाद झाला. विशेष म्हणजे तळाला फलंदाजीसाठी येणारा गोलंदाज जोफ्रा आर्चरने संघासाठी सर्वाधिक ३० धावा केल्या. २७ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने ३० धावा केल्या.
रोहित शर्माची पाठीवर थाप
सामना संपल्यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू हस्तांदोलनासाठी रांगेत येत असताना रोहित शर्मा आणि वैभव सूर्यवंशी समोरासमोर आले. यावेळी रोहित शर्माने वैभव सूर्यवंशीच्या पाठीवर थाप मारली आणि त्याच्या खेळीचे कौतुक करत त्याच्याशी काही वेळ हितगुज साधले. यावेळी माजी क्रिकेटपटू आणि समालोचक रवी शास्त्री यांनी म्हटले की, रोहित शर्माच्या प्रेरणादायी शब्दांतून वैभव सूर्यवंशी नक्कीच काहीतरी शिकेल.
रवी शास्त्री यांनी पुढे म्हटले की, मुंबई इंडियन्सचा प्रत्येक खेळाडू वैभव सूर्यवंशीला प्रोत्साहन देत होता. मुंबई संघाचा प्रत्येक खेळाडू वैभवशी काही ना काही बोलत पुढे जात होता. काल त्याने शतक ठोकले होते, आज तो शून्यावर बाद झाला. पण खेळात हे होतच असते, हे त्याला शिकायला मिळेल.
© IE Online Media Services (P) Ltd