Rohit Sharma has broken MS Dhoni’s record of most sixes Record : आयपीएल २०२४ च्या २० व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा फलंदाज रोहित शर्माने वेगवान फलंदाजी करत ४९ धावांची खेळी केली. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या या सामन्यात रोहितचे अर्धशतक एका धावेने हुकले, परंतु या सामन्यातील खेळीच्या जोरावर अनेक विक्रमाला गवसणी घातली. त्याने विराट कोहली आणि डेव्हिड वॉर्नरच्या खास क्लबमध्ये स्थान मिळवले. रोहितने या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. त्याने या सामन्यात १८० च्या वर स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याचबरोबर या सामन्यात त्याने एमएस धोनीचाही एक विक्रम मोडला.

कोहली-वॉर्नरच्या क्लबमध्ये रोहितची एन्ट्री –

रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात ४९ धावांच्या खेळीत आयपीएलमध्ये १००० धावा पूर्ण केल्या. यासह रोहित डेव्हिड वॉर्नर आणि विराट कोहली यांच्यानंतरचा तिसरा फलंदाज बनला आहे, ज्याने आयपीएलमध्ये दोन संघांविरुद्ध १००० हून अधिक धावा केल्या आहेत. वॉर्नरने हा पराक्रम पंजाब किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध केला आहे. विराट कोहलीने दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध ही कामगिरी केली आहे. त्याच वेळी, रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध १००० हून अधिक धावा केल्या आहेत.

टी-२० मध्ये सर्वाधिक बाउंड्रीज (चौकार+षटकार) मारणारे फलंदाज –

रोहित शर्मा हा टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक बाउंड्रीज मारणारा फलंदाज आहे. रोहित हा एकमेव भारतीय फलंदाज आहे ज्याच्या नावावर या फॉरमॅटमध्ये १५०० हून अधिक बाउंड्रीज आहेत. रोहितने टी-२० फॉरमॅटमध्ये आतापर्यंत १५०८ बाउंड्रीज मारल्या आहेत. यानंतर विराट कोहलीचे नाव आहे, ज्याने टी-२० मध्ये १४८६ बाउंड्रीज मारल्या आहेत. शिखर धवन १३३७ बाउंड्रीजसह तिसऱ्या स्थानावर आहे. भारताचा माजी फलंदाज सुरेश रैना ११०३ बाउंड्रीजसह चौथ्या स्थानावर आहे.

हेही वाचा – MI vs DC : रोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध रचला इतिहास, ‘हा’ विक्रम करणारा विराट कोहलीनंतर ठरला दुसराच खेळाडू

रोहित शर्माने मोडला एमएस धोनीचा विक्रम –

रोहित शर्माने दिल्लीविरुद्धच्या खेळीत ३ षटकार मारले आणि आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज ठरला. रोहित शर्माने दिल्लीविरुद्ध आतापर्यंत एकूण ४९ षटकार मारले आहेत, जे या लीगमधील कोणत्याही एका संघाविरुद्ध भारतीय फलंदाजाने मारलेले सर्वाधिक षटकार आहेत. याआधी धोनीने आरसीबीविरुद्ध एकूण ४६ षटकार ठोकले होते, मात्र आता तो या यादीत दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.

हेही वाचा – RR vs RCB : राजस्थान रॉयल्सने रचला इतिहास! आयपीएलच्या दोन हंगामात ‘हा’ पराक्रम करणारा ठरला पहिलाच संघ

आयपीएलमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज –

४९ षटकार – रोहित शर्मा विरुद्ध डीसी
४६ षटकार – एमएस धोनी विरुद्ध आरसीबी
३८ षटकार – रोहित शर्मा विरुद्ध केकेआर
३८ षटकार – विराट कोहली विरुद्ध सीएसके
३८ षटकार – एमएस धोनी विरुद्ध डीसी