कर्णधार श्रेयस अय्यरच्या नेतृत्त्वाखालील केकेआरचा संघ पहिला क्वालिफायर सामना जिंकत आयपीएल २०२४ च्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. क्वालिफायर सामन्यात हैदराबाद संघाचा अवघ्या १३.४ षटकांत ८ विकेट्सने पराभव केला. या सामन्यात केकेआरसाठी गोलंदाज आणि फलंदाजांनी अप्रतिम कामगिरी केली. या सामन्यात हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. संघ पूर्ण २० षटकेही खेळू शकला नाही आणि १५९ धावांवर ऑलआऊट झाला.

केकेआरकडून श्रेयस अय्यर आणि व्यंकटेश अय्यर यांनी शानदार खेळी खेळली. या खेळाडूंमुळेच केकेआर संघाने अवघ्या १४ षटकांत सामना जिंकला. या विजयासह KKR संघाने IPL 2024 च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. रहमानउल्ला गुरबाज आणि सुनील नारायण यांनी केकेआर संघाला चांगली सुरुवात करून दिली. मात्र गुरबाज २३ धावा करून बाद झाला. टी नटराजनने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर सुनील नारायणही २१ धावा करून बाद झाला. पण त्यानंतर व्यंकटेश अय्यर आणि श्रेयस अय्यरने दमदार फलंदाजी केली. या दोन्ही खेळाडूंनी विजयापर्यंत नेले. व्यंकटेश अय्यरने ५१ धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने ५८ धावांचे योगदान दिले.

श्रेयस अय्यरने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये अर्धशतक झळकालेच पण अजून एक मोठी कामगिरी केली आहे. कर्णधार म्हणून त्याने आयपीएलच्या प्लेऑफमध्ये दोनदा अर्धशतके केली आहेत. त्याच्याआधी महेंद्रसिंग धोनी, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर यांनीही कर्णधार म्हणून दोनदा आयपीएल प्लेऑफमध्ये ५० अधिक धावा केल्या आहेत. आता श्रेयस अय्यरने या दिग्गज खेळाडूंची बरोबरी केली आहे.

हेही वाचा – IPL 2024: “माझी आई अजूनही रुग्णालयात…”, KKR चा खेळाडू आई आजारी असतानाही सामना खेळण्यासाठी का आला? स्वत सांगितले कारण

श्रेयस अय्यरने आयपीएलमध्ये रचला इतिहास

श्रेयस अय्यर हा आयपीएलच्या इतिहासातील पहिला कर्णधार ठरला आहे ज्याने वेगवेगळ्या संघांना दोनदा आयपीएल फायनलमध्ये नेले आहे. त्याच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल २०२० ची अंतिम फेरी गाठली. आता त्याने केकेआरला अंतिम फेरीत नेले आहे. महेंद्रसिंग धोनीने फक्त चेन्नई सुपर किंग्ज आणि रोहित शर्माने फक्त मुंबई इंडियन्सला आयपीएल फायनलमध्ये नेले आहे.

आयपीएल प्लेऑफमध्ये सर्वाधिक वेळेस ५० अधिक धावा करणारे कर्णधार:
२ वेळा- एमएस धोनी
२ वेळा- रोहित शर्मा
2 वेळा- डेव्हिड वॉर्नर
२ वेळा- श्रेयस अय्यर

हेही वाचा – USA vs BAN: अमेरिकेने दिली आगमनाची नांदी; बांगलादेशवर साकारला शानदार विजय

KKR संघाने सनरायझर्स हैदराबादला हरवून आयपीएल २०२४ च्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे. केकेआरने चौथ्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. संघाने २०१२, २०१४, २०२१ आणि २०२४ या वर्षात ही कामगिरी केली आहे. गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरने २०१२ आणि २०१४ मध्येही विजेतेपद पटकावले होते. तर आयपीएल २०२१ च्या फायनलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा संघ चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध हरला होता.