Abhishek Breaks Chris Gayle and Sunil Narine’s Record in IPL : आयपीएल २०२४ मधील १८ व्या सामन्यात, सनरायझर्स हैदराबादने गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा एकतर्फी ६ गडी राखून पराभव केला. त्याबरोबर या विजयाच्या जोरावर हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात हैदराबादला १६६ धावांचे लक्ष्य मिळाले होते, जेव्हा संघ त्याचा पाठलाग करण्यासाठी आला तेव्हा २३ वर्षीय अभिषेक शर्माने केवळ १२ चेंडूत ३७ धावांची खेळी करत सामना पूर्णपणे एकतर्फी केला. त्याच्या या खेळीच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने हे लक्ष्य केवळ १८.१ षटकांत ४ गडी गमावून पूर्ण केले. या दरम्यान अभिषेकने ख्रिस गेल आणि सुनील नरेन यांच्या नावावर असलेला एक विक्रमही मोडीत काढला.

अभिषेकने गेल आणि नरेनला टाकले मागे –

चेन्नई सुपर किंग्जच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सनरायझर्स हैदराबाद संघ मैदानात उतरला, तेव्हा अभिषेक शर्माने डावाचे दुसरे षटक टाकण्यासाठी आलेल्या मुकेश चौधरीविरुद्ध आक्रमक पवित्रा स्वीकारला. त्याने या षटकात ३ षटकार आणि २ चौकारांसह एकूण २६ धावा केल्या. यासह, तो आयपीएलच्या इतिहासात एका डावाच्या दुसऱ्या षटकात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. त्याने याबाबतीत वेस्ट इंडिजचे दिग्गज ख्रिस गेल आणि सुनील नरेन यांना मागे टाकले.

यापूर्वी हा विक्रम सुनील नरेन आणि ख्रिस गेलच्या नावावर होता, या दोन्ही खेळाडूंनी २४-२४ धावा केल्या होत्या. या हंगामाता आतापर्यंत अभिषेकचा फॉर्म खूपच चांगला आहे, ज्यामध्ये तो १६१ धावांसह ऑरेंज कॅपच्या शर्यतीत पाचव्या स्थानावर पोहोचला आहे, ज्यामध्ये त्याने २१७.५७ च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.

हेही वाचा – Rishi Sunak : ब्रिटनच्या पंतप्रधानांनी इंगलंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनचा केला सामना, VIDEO होतोय व्हायरल

आयपीएलच्या डावातील दुसऱ्या षटकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज –

अभिषेक शर्मा – २६ धावा (मुकेश चौधरी, वर्ष २०२४)
सुनील नरेन – २४ धावा (वरुण चक्रवर्ती, वर्ष २०१९)
ख्रिस गेल – २४ धावा (भुवनेश्वर कुमार, वर्ष २०१५)
ख्रिस गेल – २४ धावा (मनप्रीत गोनी, २०१२)

हेही वाचा – IPL 2024 : आज आरसीबीसमोर राजस्थानच्या विजय रथाला रोखण्याचे आव्हान, आतापर्यंत कोणाचे राहिले वर्चस्व? जाणून घ्या

युवराज सिंग आणि ब्रायन लारा यांचे मानले आभार –

त्याच्या छोट्या पण स्फोटक खेळीच्या जोरावर अभिषेक शर्माने या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार पटकावला. यावेळी तो म्हणाला की, ‘गोलंदाजी करताना आम्हाला ही विकेट थोडी संथ असल्याचे जाणवले होते. अशा परिस्थितीत, आम्हाला कळले की पॉवरप्लेमध्ये धावा जलद कराव्या लागतील. कारण चेंडू जुना झाल्यानंतर, खेळपट्टीवरून चेंडू आणखी हळू येईल. या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी आम्ही खूप चांगली तयारी केली होती. मोठी धावसंख्या निश्चितच महत्त्वाची असते पण मला माझा वेग कायम ठेवायचा होता. माझ्या वडिलांव्यतिरिक्त मला विशेषतः युवराज सिंग आणि ब्रायन लारा यांचे आभार मानायचे आहेत.’