Sunil Gavaskar criticizes Riyan Parag : आयपीएल २०२४ मधील राजस्थान रॉयल्सचा प्रवास संपुष्टात आला आहे. चेन्नई येथे झालेल्या क्वालिफायर २ सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून ३६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. राजस्थानच्या पराभवाचे मुख्य कारण म्हणजे त्यांची फलंदाजी ठरली. साखळी सामन्यात धावा करून संघाला विजय मिळवून देणारे फलंदाज प्लेऑफमध्ये निराश करताना दिसले. यात त्याच्या चुकीच्या शॉट निवडीचा मोठा वाटा आहे. सनरायझर्सविरुद्ध दडपणाखाली असलेल्या रियान परागने असा चुकीचा शॉट खेळला की, कॉमेंट्री करत असलेले सुनील गावसकर त्याच्यावर संतापले आणि त्यांनी कॉमेंट्री बॉक्समध्येच रियान परागवर सडकून टीका केली.

राजस्थान रॉयल्सला क्वालिफायर २ मध्ये सनरायझर्स हैदराबादक़ून १७६ धावांचे लक्ष्य मिळाले होते. या लक्ष्याचा पाठलाग करताना नियमित अंतराने विकेट पडत राहिल्याने सुरुवातीला गती मिळू शकली नाही. पहिल्या १० षटकात ३ गडी गमावून ७३ धावा केल्यानंतर राजस्थानने ११ व्या षटकात ६ धावा केल्या. यावेळी शेवटचा चौकार येऊन बराच वेळ झाला होता आणि त्याचे दडपण रियान परागवर दिसत होते. याच दडपणाखाली रियान परागने चूक केली आणि १२व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर डीप मिडविकेटवर उभा असलेल्या अभिषेक शर्माच्या हाती झेल देत तो बाद झाला.

रियान परागचे शॉट सिलेक्शन पाहून सुनील गावसकर संतापले –

शाहबाज अहमदचा बळी ठरलेल्या रियान परागला १० चेंडूंचा सामना केल्यानंतर केवळ ६ धावा करता आल्या. रियान पराग ज्या प्रकारे आऊट झाला, ते प्रकार पाहून कॉमेंट्री करत असलेले सुनील गावसकर त्याच्यावर चांगले संतापले. यावर सुनील गावसकर म्हणाले, अशा टॅलेंटचा काय उपयोग, ज्यांना योग्य शॉट सिलेक्शनची निवड करता येत नाही.

हेही वाचा – SRH vs RR : डॅनियल व्हिटोरीच्या मास्टरस्ट्रोकने बदलला सामना! पॅट कमिन्सने विजयानंतर केला मोठा खुलासा

…तर अशा टॅलेंटचा उपयोग काय?

रियानचा शॉट पाहिल्यानंतर गावसकर कॉमेंट्री करताना म्हणाले, “सिरियसली… हा कसला शॉट होता? जर तुम्ही विचारपूर्वक शॉट सिलेक्शन करत नसाल, तर अशा टॅलेंटचा उपयोग काय? तुमच्यात खूप टॅलेंट आहे. हे मान्य पण सोबत संयम नसेल तर काही उपयोग नाही. डॉट बॉलच्या दबावाखाली असे फटके खेळून विकेट गमावणे योग्य नाही. डॉट बॉल्स पुढे जाऊन भरुन काढता आले असते.”

हेही वाचा – SRH vs RR : “वडिलांचा उल्लेख विशेषतः महत्वाचा…”, हैदराबाद फायनलमध्ये पोहोचल्यानंतर अभिषेक शर्मा असं का म्हणाला?

रियानची विकेट हा सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरला –

उत्कृष्ट फॉर्मात असलेल्या रियान परागची विकेट सामन्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची ठरली. तो बाद झाल्यानंतर १५ चेंडूंत आणखी तीन विकेट पडल्या. त्यामुळे या सामन्यात राजस्थानचा पराभव निश्चित झाला. तो बाद होण्यापूर्वीच संजू सॅमसनची विकेट पडली होती. अशा परिस्थितीत सर्व जबाबदारी रियानवर होती पण तोही विकेट फेकून निघून गेला. २००८ चा चॅम्पियन संघ शेवटपर्यंत या धक्क्यांमधून सावरू शकला नाही आणि हैदराबादने ३६ धावांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला. शाहबाज या सामन्याचा स्टार खेळाडू ठरला.