Suryakumar Yadav World Record in T20: मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यंदाच्या मोसमात वादळी फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यागणिक सूर्यकुमार यादवचा फॉर्म कायम राहिला आहे. आयपीएल २०२५ मध्ये खराब सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन करणाऱ्या आणि प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी सूर्यकुमार यादवच्या दमदार फलंदाजीने मोठी भूमिका बजावली. लीगच्या शेवटच्या सामन्यातही हीच कामगिरी कायम ठेवून सूर्यकुमार यादवने विश्वविक्रम केला आहे.
सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सच्या गेल्या सामन्यात वादळी खेळी करत विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. आता सूर्यकुमार यादवने पंजाब किंग्स विरूद्ध सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी करत वर्ल्ड रेकॉर्ड केला. सूर्यकुमार यादवने पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यातही शेवटपर्यंत मैदानावर राहत अर्धशतकी खेळी करत संघाला महत्त्वपूर्ण धावा करून दिल्या.
सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. मुंबईकडून या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा सूर्या एकमेव खेळाडू होता. सूर्यकुमार यादवने या कामगिरीसह टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
सहाव्या षटकात पहिली विकेट गमावल्यानंतर सूर्या मैदानावर आला आणि त्याने येताच चौकार मारून धावा काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान, सूर्याने ९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, ज्यामुळे त्याची धावसंख्या २२ धावांवरून २६ धावांवर पोहोचली. सूर्याने या एका चौकाराने इतिहास रचला. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सलग १४ व्या डावात २५ धावांचा टप्पा ओलांडला. यासह, त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी टी-२० कर्णधार टेम्बा बावुमाला मागे टाकत एक नवा विश्वविक्रम रचला.
इतकंच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजाने लीग स्टेजच्या प्रत्येक सामन्यात २५ पेक्षा जास्त धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजाने या हंगामात सर्व लीग स्टेज सामन्यांमध्ये २५+ धावांच्या खेळी खेळल्या आहेत. त्याच्या आधी, २०१८ मध्ये, केन विल्यमसनने आयपीएलमध्ये सलग १३ डावांमध्ये २५+ धावा केल्या होत्या. तर, शुबमनने २०२३ मध्ये सलग १३ डावांमध्ये २५+ धावांच्या खेळीही खेळल्या.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा २५ अधिक धावा करणारे फलंदाज
१४ – सूर्यकुमार यादव (२०२५)
१३ वेळा टेम्बा बावुमा (२०१९-२०)
११ – ब्रॅड हॉज (२००५-०७)
११ – जॅक रुडोल्फ (२०१४-१५)
११ – कुमार संगकारा (२०१५)
११ – ख्रिस लिन (२०२३-२४)
११ – काइल मेयर्स (२०२४)