Virat Kohli Post for Anushka Sharma Birthday: भारताचा रनमशीन विराट कोहलीची पत्नी आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिचा वाढदिवस आहे. अनुष्का आज म्हणजेच १ मे रोजी तिचा ३७ वा वाढदिवस साजरा करत आहे. दरम्यान विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्मासाठी तिच्या वाढदिवसानिमित्त खास पोस्ट शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.

क्रिकेट आणि बॉलीवूडमधील पॉवर कपल म्हणून विराट आणि अनुष्काच्या जोडीकडे पाहिलं जातं. हे दोघेही सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसले तरी एकमेकांच्या वाढदिवसाला आणि खास क्षणांचे फोटो शेअर करायला कधीच विसरत नाहीत. त्यामुळे चाहते या दोघांच्या पोस्टची आतुरतेने वाट पाहत असतात.

विराटने अनुष्का शर्मासाठी शेअर केलेल्या वाढदिवसाच्या पोस्टवर चाहत्यांनी तर लाईक्सचा पाऊस पाडला आहे. अवघ्या काही मिनिटातच त्याच्या पोस्टवर मिलियनमध्ये लाईक्स आले. तर अर्धा तासाच्या आत लाईक्सने २.३ मिलियनचा टप्पा गाठला होता.

विराट कोहलीने अनुष्का शर्माबरोबरचा एक सुंदर फोटो पोस्ट करत खाली कॅप्शनमध्ये लिहिलं, “माझी मैत्रीण, माझी जोडीदार, माझी सेफ स्पेस, माझी बेस्ट हाफ आणि माझं सर्व काही. तू आमच्या जीवनाची मार्गदर्शक आहेस. आम्ही सर्व तुझ्यावर खूप प्रेम करतो आणि हे प्रेम रोज वाढत जातंय. हॅपी बर्थडे माय लव्ह…” आणि पुढे विराटने हार्ट इमोजी पोस्ट करत अनुष्काला टॅग केलं आहे.

विराट कोहली सध्या आयपीएल २०२५ मध्ये व्यस्त आहे. आरसीबीच्या संघानेही खास फोटो पोस्ट करत अनुष्का शर्माला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आरसीबीचा गेला सामना दिल्लीमध्ये दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध होता. या सामन्यानंतर सध्या आरसीबीचा संघ ब्रेकवर आहे. तर संघाचा पुढील सामना ३ मे रोजी घरच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध असणार आहे.

विराट अनुष्काची लव्हस्टोरी

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा २०१३ मध्ये एका शॅम्पूच्या जाहिरातीदरम्यान भेटले होते. यानंतर त्या दोघांची मैत्री झाली आणि भेटीगाठी वाढल्या. पुढे जाऊन या मैत्रीने प्रेमाचं रूप घेतलं. यानंतर अनुष्का विराटचे सामने पाहण्यासाठी स्टेडियममध्ये दिसू लागली. मग २०१७ मध्ये विराट आणि अनुष्काने त्यांचे नाते अधिकृतपणे स्वीकारले. २१ डिसेंबर २०१७ मध्ये दोघांनी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत इटलीमध्ये लग्न केलं. अनुष्का आणि विराट दोन मुलांचे आई-बाबा आहेत.