आयपीएलच्या अंतिम सामन्यातील जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने कौतुक केले आहे. भिन्न गोलंदाजीची शैली असलेल्या बुमराहने अखेरच्या षटकांमध्ये टिच्चून मारा करत चेन्नईच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्यापासून रोखले. मुंबईने चेन्नईवर अवघ्या एका धावेने विजय मिळवला. त्यामध्ये बुमराहची अखेरच्या दोन षटकातील गोलंदाजी महत्वपूर्ण ठरली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बुमरहाने त्याच्या वाटयाच्या चार षटकांमध्ये १४ धावा देत दोन गडी बाद केले. सध्याच्या घडीला जसप्रीत बुमराह जगातला सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याची सर्वोत्तम कामगिरी अजूनही बाकी आहे असे मला वाटते अशा शब्दात सचिनने जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचे कौतुक केले. सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघाचा मार्गदर्शक आहे. जुलै महिन्यात इंग्लंडमध्ये होणारी विश्वचषक स्पर्धा भारताला जिंकायची असेल तर बुमराहला महत्वाची भूमिका बजावावी लागेल असे सचिनने म्हटले आहे.

बुमराह त्याची अखेरची दोन षटके टाकण्यासाठी आला त्याआधीच्या षटकात लसिथ मलिंगाने २० धावा दिल्या होत्या. बुमराहने आपल्या पहिल्या दोन षटकात अंबाती रायडूच्या विकेटसह फक्त सहा धावा दिल्या होत्या. बुमराहची गोलंदाजीची शैली वेगळी आहे. त्यामुळे काय गतीने चेंडू येणार आहे त्याचा फलंदाजालाही अंदाज बांधता येत नाही असे बुमराहचा मुंबई इंडियन्स संघातील सहकारी युवराज सिंग म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah best bowler in world sachin tendulkar