Jasprit Bumrah Breaks Kapil Dev Record: जसप्रीत बुमराह हा जगातील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने अनेकदा हे सिध्दही करून दाखवलं आहे. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. मात्र दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने सुरुवातीलाच ३ मोठे धक्के दिले. यासह जसप्रीत बुमराहने मोठ्या रेकॉर्डमध्ये कपिल देव यांना मागे टाकलं आहे.

लॉर्ड्स कसोटीतील दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराहने लागोपाठ दोन चेंडूंवर दोन मोठे धक्के दिले. यासह इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत त्याने कपिल देव यांना मागे टाकलं आहे. इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक गडी बाद करण्याचा रेकॉर्ड हा ईशांत शर्माच्या नावावर आहे. ईशांतने २०११ पासून ते २०२१ पर्यंत इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना १५ कसोटी सामन्यांमध्ये ५१ गडी बाद केले आहेत.

इंग्लंडमध्ये कसोटी क्रिकेट खेळताना सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या भारतीय गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. बुमराहने आतापर्यंत ११ सामन्यांमध्ये ४६ गडी बाद केले आहेत. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या सामन्यातील दुसऱ्या डावासह आणखी दोन सामने शिल्लक आहेत. त्यामुळे जसप्रीत बुमराह सर्वाधिक गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचू शकतो. कपिल देव यांनी १३ सामन्यांमध्ये ४३ गडी बाद केले होते.

इंग्लंडला लागोपाठ ३ मोठे धक्के

पहिल्या दिवशी बेन स्टोक्स आणि जो रूट यांनी मिळून इंग्लंडला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं. इंग्लंडने ४ गडी बाद २५१ धावा केल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर रूटने चौकार मारला आणि आपलं शतक पूर्ण केलं. त्यानंतर बुमराहने बेन स्टोक्सला बाद करत माघारी धाडलं. बेन स्टोक्स बाद होताच जो रूटने देखील त्रिफळाचित होऊन माघारी परतला. त्यानंतर पुढील चेंडूवर त्याने ख्रिस वोक्सला झेलबाद केलं. यासह लागोपाठ २ चेंडूंवर त्याने सलग २ गडी बाद केले.

इंग्लंडमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे भारतीय गोलंदाज

ईशांत शर्मा – १५ सामने, ५१ गडी

जसप्रीत बुमराह- ११ सामने, ४६ गडी

कपिल देव – १३ सामने, ४३ गडी