ऑस्ट्रेलियात १६ ऑक्टोबरपासून खेळवल्या जाणाऱ्या टी२० विश्वचषकामध्ये भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबद्दल सर्वांनाच प्रश्न पडला होता. मात्र बीसीसीआयने क्रिकेटप्रेमींचा हा संभ्रम दूर केला आहे. जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे आगामी टी२० विश्वचषकातून बाहेर झाला असून बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी२० सामन्याआधीच्या सराव सत्रादरम्यान बुमराहला पाठदुखीची तक्रार जाणवू लागली. त्यानंतर त्याला बंगळूरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल करण्यात आले. तेथे त्याच्या काही चाचण्या करण्यात आल्यानंतर तो टी२० विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.

जसप्रीत बुमराहचे टी२० विश्वचषकातून बाहेर पडणे हे क्रिकेटप्रेमींसह भारतीय संघासाठीही धक्कादायक आहे. या बातमीनंतर सोशल मीडियावरही अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जाऊ लागल्या. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही बुमराहला लवकरच पुन्हा खेळताना पाहू अशी आशा व्यक्त केली होती. दरम्यान, बीसीसीआयमच्या घोषणेनंतर आता स्वतः जसप्रीत बुमराहने याबाबाद पहिली प्रतिक्रिया दिली आहे. बुमराह म्हणाला की, या चषकातून बाहेर पडावे लागल्यामुळे मी निराश आहे.

सोमवारी बीसीसीआयने, जसप्रीत बुमराह टी२० विश्वचषकात खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट केले. बीसीसीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय, “बीसीसीआय वैद्यकीय संघाने टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला आयसीसी पुरुषांच्या टी२० विश्वचषक संघातून वगळले आहे. तज्ञांशी सल्लामसलत केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.” यानंतर पहिल्यांदाच जसप्रीत बुमराहने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

जसप्रीत बुमराह म्हणाला, “यावेळेस मी टी२० विश्वचषकाचा भाग नसणार आहे हे पाहिल्यावर मी खूपच निराश झालो आहे. मात्र माझ्या प्रियजनांकडून मला मिळालेल्या शुभेच्छा, काळजी आणि पाठिंब्याबद्दल मी आभारी आहे.”

तसेच, बरे झाल्यानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियातील मोहिमेदरम्यान पाठिंबा देणार असल्याचंही तो म्हणाला.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Jasprit bumrah remains silent on t20 world cup exit news said i am disappointed pvp
First published on: 04-10-2022 at 13:25 IST