पीटीआय, लीड्स

गोलंदाजीवरील ताणाच्या व्यवस्थापनाचा भाग म्हणूनच इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) दरम्यान भारताचे कर्णधारपद स्वीकारण्यास नकार दिला, असे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने सांगितले. कर्णधाराच्या जबाबदारीपेक्षा गोलंदाजीच्या जबाबदारीला प्राधान्य देण्याची इच्छा तेव्हा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (बीसीसीआय) व्यक्त केल्याचे बुमरा म्हणाला. ‘‘मला कर्णधारपदापासून दूर ठेवण्यामागे कुठल्याही कथा किंवा वाद नाहीत. रोहित आणि विराट यांनी निवृत्ती घेण्यापूर्वीच आपण पाच सामन्यांच्या मालिकेतील ताणाविषयी ‘बीसीसीआय’ पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली होती,’’असेही बुमराने सांगितले. माझ्या पाठीच्या दुखापतीवर उपचार करणारे डॉक्टर आणि नंतर तंदुरुस्ती संदर्भात व्यवस्थापन करणाऱ्या तज्ज्ञांशी चर्चा केल्यानंतर लगेचच मला कर्णधारपदाच्या भूमिकेत पाहू नये. पाच सामन्यांच्या मालिकेतील सर्व सामने खेळू शकणार नाही, असे ‘बीसीसीआय’ला दूरध्वनी करून सांगितल्याचेही बुमराने स्पष्ट केले.

‘‘पाच सामन्यांच्या मालिकेत मला कर्णधार आणि गोलंदाजीचा ताण अशी दुहेरी जबाबदारी पेलणे अशक्य होते. संघाच्या हितासाठी ते योग्य नव्हते. त्यामुळे गोलंदाजीच्या जबाबदारीला प्राधान्य दिले,’’ असे बुमरा म्हणाला. बुमरा या संपूर्ण मुलाखती कर्णधारपदाच्या जबाबदारीलाच धरून अधिक बोलला. ‘‘कर्णधार ही एक जबाबदारी आहे. कर्णधाराचा अर्थ खूप मोठा आहे. मी त्यासाठी खूप मेहनत घेतली होती. माझी कर्णधार बनण्याची इच्छादेखील होती. पण, तंदुरुस्तीच्या कारणास्तव दुर्दैवाने मी कर्णधारपदाचे मोठे स्वप्न पाहणे सोडून दिले. कर्णधारपदापेक्षा क्रिकेटपटू आणि भारतीय संघासाठी अधिक योगदान देणारा खेळाडू म्हणून राहणे मला अधिक आवडेल,’’ असेही बुमराने सांगितले. ‘‘आगामी मालिकेत किती सामने खेळणार हे निश्चित नाही. परिस्थिती, गोलंदाजीचा ताण पाहून किती सामने खेळायचे याचा निर्णय घेईन. पण, सध्या तरी माझी तीनच सामने खेळण्याची मानसिकता आहे,’’असे बुमरा म्हणाला.

बुमराची शैली ग्लेन मॅकग्रासारखी समतोल ब्रॉड

भारताचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराची शैली ही ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅकग्रासारखी समतोल आहे. फलंदाजांना फसविण्याची क्षमता आणि चेंडू टाकण्याचे उत्कृष्ट संतुलन अशा समतोल शैलीमुळे आगामी मालिकेत बुमराच्या गोलंदाजीकडे लक्ष राहील, असे इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉड याने म्हटले आहे. बुमरा ताशी ७० कि.मी. वेगान धावतो आणि त्याचा चेंडू ९० कि.मी. वेगाने येतो. त्यामुळे फलंदाजाला चेंडूचा नेमका प्रवाह समजत नाही. बुमराचे चेंडू टाकण्याचे तंत्र वेगळे आहे, असे ब्रॉड म्हणाला.

मी काळजी न घेतल्यास भविष्याबद्दल काही सांगता येणार नाही. अचानक या खेळातून बाहेर पडावे लागेल, अशी स्थिती मला उद् भवू द्यायची नाही. -जसप्रीत बुमरा, वेगवान गोलंदाज.