‘इंग्लंडचा अनुभवी फलंदाज जो रुटने बॅझबॉल तंत्राने खेळणं सोडून द्यावं आणि स्वत:च्या नैसर्गिक शैलीत खेळावं’, असा सल्ला ऑस्ट्रेलियाचे माजी खेळाडू इयान चॅपेल यांनी दिला आहे. राजकोट कसोटीत प्रचंड फरकाने पराभूत झाल्यानंतर इंग्लंडच्या बॅझबॉल तंत्रावर प्रचंड टीका होऊ लागली आहे. ब्रेंडन मॅक्युलम इंग्लंडच्या कसोटी संघाचे प्रशिक्षक आहेत. ते ‘बॅझ’ या टोपणनावाने प्रसिद्ध आहेत. प्रशिक्षकपदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून इंग्लंडच्या कसोटी संघाने आक्रमक पद्धतीचं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. ही शैली यशस्वी ठरल्याने त्याला बॅझबॉल असं नाव मिळालं. सध्याच्या भारत दौऱ्यात मात्र बॅझबॉल तंत्रातल्या उणीव उघड झाल्याचं माजी खेळाडूंचं म्हणणं आहे.

इंग्लंडचा सगळ्यात अनुभवी फलंदाज जो रुट पहिल्या डावात अतिशय आततायी फटका खेळून बाद झाला. इंग्लंडचा संघ सुस्थितीत असताना रूटने हा फटका खेळला. रुट बाद होताच संघाची लय बिघडली. रूटसारखा अनुभवी फलंदाज रिव्हर्स रॅम्पसारखा फटका खेळून बाद होतो हे पाहून असंख्य चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. राजकोट कसोटीत इंग्लंडचा संघ ४३४ धावांनी पराभूत झाला होता. १९३४ नंतरचा त्यांचा हा सगळ्यात मोठा असा पराभव आहे.

भारताच्या ४४५ धावांसमोर खेळताना इंग्लंडचा संघ २२४/२ असा सुस्थितीत होता. बेन डकेट १४१ तर रूट १८ धावांवर खेळत होते. इंग्लंडचा संघ पिछाडीवर असला तरी त्यांची धावगती उत्तम होती. यामुळेच भारतीय संघावर दडपण होतं. त्यातच कौटुंबिक कारणांमुळे रवीचंद्रन अश्विन चेन्नईला परतला होता. यामुळे भारताकडे एक गोलंदाज कमी होता. अशा परिस्थितीत मोठी धावसंख्या रचण्याची संधी इंग्लंडकडे होती. मात्र तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर रूटने रिव्हर्स रॅम्पचा फटका खेळला. रूटचा प्रयत्न स्लिपमध्ये यशस्वी जैस्वालच्या हातात जाऊन विसावला. २०७/२ या स्थितीतून इंग्लंडचा डाव ३१९ धावांतच आटोपला. भारतीय संघाला १२६ धावांची आघाडी मिळाली. भारताच्या विजयात ही आघाडी निर्णायक ठरली होती. त्यामुळेच रूटच्या या फटक्यावर इंग्लंडच्या पराभवाचं खापर फुटलं.

‘रूटने अचानक शैलीत बदल करू नये. जगभरात सगळीकडे सातत्याने धावा करणाऱ्यांपैकी रूट एक आहे. भारतात त्याची कामगिरी उत्तम होते. धावफलक हलता ठेऊन एकेरी-दुहेरी धावा आणि चौकार यांचा सुरेख मिलाफ त्याचा खेळात असतो. त्याने अचानकच शैली का बदलली आहे ते समजत नाही. रिव्हर्स रॅम्प, रिव्हर्स स्विच, रिव्हर्स स्वीप असे फटके फलंदाजांनी मारू नयेत’, असं चॅपेल यांनी नाईन वर्ल्ड ऑफ स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं.

रुटची या मालिकेतली कामगिरी यथातथाच राहिली आहे. मॅक्युलम यांनी प्रशिक्षक म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वीही रूटची कसोटीतली सरासरी ४९.३२ अशी उत्तम होती. मॅक्युलम प्रशिक्षक झाल्यानंतर रूटची सरासरी ५०.१२ झाली आहे. त्याच्या सरासरीत मॅक्युलम यांच्या आगमनाने किचिंतसा फरक पडला आहे.

चॅपेल सांगतात, ‘परिस्थितीनुरुप खेळणं अतिशय आवश्यक आहे. खेळपट्टी कशी आहे, गोलंदाज कशा पद्धतीने गोलंदाजी करत आहेत, क्षेत्ररक्षण कसं सजवण्यात आलं आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपला संघ कोणत्या स्थितीत आहे, प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवण्याची स्थिती आहे का हे पाहणंही आवश्यक आहे असं चॅपेल म्हणाले. चांगल्या गोलंदाजासमोर चांगल्या चेंडूंचा सन्मान करणं आवश्यक आहे. प्रत्येकवेळी तुम्हाला वाट्टेल तसे फटके खेळता येत नाहीत. गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक मिळून रणनीती ठरवतात. त्यांनीही तुम्हाला बाद करण्यासाठी विचार केलेला असतो. चांगल्या स्पेलदरम्यान असा फटका खेळणं योग्य नाही’.

ते पुढे म्हणाले, ‘धावा सातत्याने कशा करता येतील हे उद्दिष्ट बरोबरच आहे पण त्या धावा कोणाविरुद्ध करायच्या त्याची आखणी करायला हवी. काही गोलंदाज आक्रमणातील कच्चे दुवे असतात. त्यांच्यासमोर धावा करता येतात पण काही गोलंदाज शिस्तबद्ध आणि भेदक असतात. त्यांच्याविरुद्ध असे फटके खेळणं आत्मघातकी ठरू शकतं. रुटच्या बाबतीत तसंच झालं’.

हैदराबाद कसोटीत रूटने २९ आणि २ धावा केल्या. विशाखापट्टणम कसोटीत त्याने ५ आणि १६ धावा केल्या. राजकोट कसोटीतही रूटला मोठी खेळी करता आली नाही. त्याने १८ आणि ७ धावा केल्या. रांची आणि धरमशाला कसोटीत इंग्लंडला रुटकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे. भारतात रूटने १३ कसोटीत ४१.१६च्या सरासरीने १०२९ धावा केल्या आहेत. यामध्ये २ शतकं आणि ५ अर्धशतकांचा समावेश आहे. २०१२ मध्ये रूटने भारतातच नागपूर इथे कसोटी पदार्पण केलं होतं.

कसोटी प्रकारात इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत रूट दुसऱ्या क्रमांकावर आहे. रूटच्या नावावर १३८ सामन्यात ११४९३ धावा आहेत. यामध्ये ३० शतकं आणि ६० अर्धशतकांचा समावेश आहे. रूटचा समावेश ‘फॅब फोर’ म्हणजेच एकाच कालखंडात धावांची टांकसाळ उघडणाऱ्या चार फलंदाजांमध्ये होतो. फॅब फोरमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्हन स्मिथ, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि रूट यांचा समावेश होतो.