अखिल भारतीय फुटबॉल महासंघ (एआयएफएफ) ला खेळाडू असलेला अध्यक्ष मिळाला आहे. ८५ वर्षांच्या इतिहासात हे प्रथमच घडले आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत कल्याण चौबे यांनी माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांचा पराभव केला. पूर्व बंगालचा माजी गोलरक्षक कल्याण चौबे यांनी ३३ -१ अशा फरकाने विजय नोंदवत भुतिया यांचा पराभव केला.

हेही वाचा – Asia Cup 2022 : ड्रेसिंग रुममधून दिलेल्या संदेशाबाबत श्रीलंकेच्या प्रशिक्षकांनी केला खुलासा, म्हणाले, “तो संदेश…”

कोण आहेत कल्याण चौबे?

कल्याण चौबे हे भाजपाचे नेते आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. कल्याण चौबे हे भारतीय वरिष्ठ फुटबॉल संघासाठी कधीही खेळले नाहीत. मात्र, काही वेळा ते भारतीय फुटबॉल संघाचा भाग होते. ते मोहन बागान आणि पूर्व बंगाल टीममध्ये गोलरक्षक म्हणून खेळले होते. विशेष म्हणजे भुतिया आणि चौबे हे दोघेही एकेकाळी पूर्व बंगाल संघात खेळाडू होते.

दरम्यान, कर्नाटक फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आणि काँग्रेसचे आमदार एनए हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यांनी राजस्थान फुटबॉल असोसिएशनच्या मानवेंद्र सिंग यांचा २९-५ अशा फरकाने पराभव केला. तर अरुणाचल प्रदेशच्या किप्पा अजय यांची खजिनदारपदी निवड झाली आहे. त्यांनी आंध्र प्रदेशच्या गोपालकृष्ण कोसाराजूचा ३२-१ अशा फरकाने पराभव केला.

हेही वाचा – Asia Cup 2022: ‘आम्हाला पण टिप्स दे ना’,’या’ टीमच्या कर्णधाराने मागितली पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमकडे मदत

भूतिया यांनी निवडणुकीनंतर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, ”मी भविष्यातही भारतीय फुटबॉलसाठी काम करत राहीन. तसेच मी कल्याण चौबे यांचेही अभिनंदन करतो. मला आशा आहे की, ते भारतीय फुटबॉलला पुढे घेऊन जातील.” तसेच त्यांनी यावेळी पाठिंबा देणाऱ्या सर्व भारतीय फुटबॉल चाहत्यांचे आभारही मानले.