महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला याचि देही याचि डोळा खेळताना पाहण्याचं भाग्य मुंबईकराना लाभणार आहे. १४ डिसेंबरला खुद्द मेसी मुंबईत खेळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात माहिती दिली. मेस्सीने मुख्यमंत्र्यांना स्वाक्षरी केलेला फुटबॉल भेट म्हणून पाठवला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक्स (पूर्वीच्या ट्वीटर) अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मेस्सी- स्वाक्षरी केलेला फुटबॉल भेट म्हणून पाठवण्याबद्दल मनापासून आभारी आहे. सार्वकालीन महान खेळाडूंच्या दौऱ्याच्या निमित्ताने तुम्ही मुंबईत खेळायला येणार आहेत. युवा चाहत्यांसाठी सर्वाधिक आनंदाचा क्षण असेल.
राज्याचा १४ वर्षांखालील फुटबॉलपटूंचा संघ, मित्रा आणि विफा यांना मेस्सीबरोबर सराव करण्याची संधी १४ डिसेंबरला मिळणार आहे.
युवा फुटबॉलपटूंना जागतिक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात यासाठी फुटबॉल चाहते आणि कॉर्पोरेट्स यांना हिरिरीने पाठिंबा देण्याचं आवाहन करतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
लिओनेल मेस्सीचा संघ येत्या नोव्हेंबर महिन्यात फ्रेंडली सामना खेळण्यासाठी केरळमध्ये दाखल होणार आहे. अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशनने शनिवारी (२३ ऑगस्ट) याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. अर्जेंटीना फुटबॉल असोसिएशनने आपल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले की, “लिओनेल स्कोलोनीच्या नेतृत्वात अर्जेंटीनाचा राष्ट्रीय संघ २०२५ मध्ये २ फिफा फ्रेंडली सामने खेळणार आहे. पहिला सामना ६ ऑक्टोबर ते १४ ऑक्टोबर दरम्यान युएसए संघाविरूद्ध खेळला जाईल. तर दुसरा १० नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर दरम्यान अंगोलातील लुआंडामध्ये आणि भारतातील केरळमध्ये खेळवला जाणार आहे.”
मेस्सी डिसेंबर महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. १२ डिसेंबरपासून तो भारतातील ४ शहरात दौरा करणार आहे. तो कोलकाताहून अहमदाबाद मग मुंबई आणि शेवटी दिल्लीला जाणार आहे. मेस्सी भारतात येण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २०११ मध्ये तो भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी तो वेनेजुएलाविरूद्ध फ्रेंडली सामना खेळण्यासाठी मैदानात देखील उतरला होता.