Jasprit Bumrah 5 Wickets, IND vs ENG: लॉर्ड्सच्या मैदानावर भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. तर दुसरा दिवस भारतीय गोलंदाजांनी गाजवला. दुसऱ्या दिवशी गोलंदाजी करताना जसप्रीत बुमराहने ५ गडी बाद केले आहेत.

लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर शतक झळकावणाऱ्या फलंदाजाचं आणि ५ गडी बाद करणाऱ्या गोलंदाजांचं नाव हॉनर्स बोर्डवर लिहिलं जातं. आता या बोर्डवर जसप्रीत बुमराहचं देखील नाव लिहिलं जाणार आहे. यासह इंग्लंडमध्ये गोलंदाजी करताना त्याने चौथ्यांदा एकाच डावात पाच गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

जसप्रीत बुमराहचा पंच

इंग्लंडचे फलंदाज पहिल्या दिवशी ४ गडी बाद २५१ धावांवर माघारी परतले होते. पहिल्या दिवशी गोलंदाजी करताना बुमराहला एक गडी बाद करता आला होता. पहिल्या दिवशी त्याने हॅरी ब्रुकला ११ धावांवर बाद केलं. दुसऱ्या दिवशी बुमराहच्या धारदार गोलंदाजीसमोर इंग्लंडचे फलंदाज नतमस्तक होताना दिसून आले. दुसऱ्या दिवसाच्या सुरुवातीला बुमराहने बेन स्टोक्सला ४४ धावांवर त्रिफळाचित केलं. त्यानंतर जो रूटला १०४ धावांवर त्रिफळाचित करत माघारी धाडलं. पुढच्याच चेंडूवर ख्रिस वोक्सला शून्यावर बाद करत माघारी धाडलं. जोफ्रा आर्चरला बाद करताच त्याने ५ विकेट्स पूर्ण केल्या.

परदेशात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा जलवा

जसप्रीत बुमराहने आतापर्यंत इंग्लंडमध्ये ४ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे. याआधी त्याने ऑस्ट्रेलियात ४ वेळेस, दक्षिण आफ्रिकेत ३ वेळेस, भारतात २ वेळेस आणि वेस्टइंडिजमध्ये २ वेळेस ५ गडी बाद करण्याचा कारनामा केला आहे.

इंग्लंडचा डाव ३८७ धावांवर संपुष्टात

या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडचा डाव ३८७ धावांवर आटोपला आहे. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना बुमराहने सर्वाधिक ५ गडी बाद केले. तर नितीश कुमार रेड्डी, सिराजने प्रत्येकी २–२ आणि जडेजाने एक गडी बाद केला. इंग्लंडकडून फलंदाजी करताना जो रूटने सर्वाधिक १०४ धावांची खेळी केली. तर जॅक क्रॉलीने १८, बेन डकेटने २३, ओली पोपने ४४, हॅरी ब्रुकने ११, बेन स्टोक्सने ४४, जेमी स्मिथने ५१, ख्रिस वोक्स ०, ब्रायडन कार्स लेन ५६, जोफ्रा आर्चरने ४ धावा केल्या आणि शोएब बशीर १ धावेवर नाबाद राहिला.