मानाच्या चार ग्रँडस्लॅम स्पर्धांपैकी एक असलेली विम्बल्डन टेनिस स्पर्धा लंडनमध्ये सुरू आहे. आज (१० जुलै) या स्पर्धेचा शेवट होत आहे. या स्पर्धेमध्ये वरिष्ठ गटांशिवाय कनिष्ठ गटांतील खेळाडूंचे सामने आयोजित केले जातात. यावर्षी कनिष्ठ गटामध्ये महाराष्ट्राच्या ऐश्वर्या जाधवने आपला झेंडा रोवला आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी तिच्या या कामगिरीची दखल घेतली आहे. दोघांनीही ट्वीट करून तिचे कौतुक केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोल्हापुरातील ऐश्वर्या जाधव हिने लंडन येथील विम्बल्डन ग्रासकोर्ट टेनिस स्पर्धेत खेळ केला. तिने शानदार खेळ करून उपस्थित टेनिस चाहत्यांची मने जिंकली. जागतिक क्रमवारीत पाचव्या क्रमांकावर असलेल्या रोमानियाच्या अँड्रिया सूरविरुद्ध खेळताना ऐश्वर्याने सर्व्हिससह इतर वेगवान फटके मारले. तिला विजय मिळवता आला नाही. मात्र, तरीदेखील तिच्या कामगिरीचे भारतभर कौतुक होत आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते संजय राऊत आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करून ऐश्वर्याचे कौतुक केले. “राजकारण रोजचेच आहे. त्या पलीकडे देखील जग आहे. महाराष्ट्राची ही कन्या देशाचे प्रतिनिधित्व करते आहे. जय महाराष्ट्र !”, असे ट्वीट राऊत यांनी केले. तर, आदित्य ठाकरे यांनी तिला ‘शायनिंग स्टार’ म्हटले आहे.

गेल्या सहा महिन्यांपासून ऐश्वर्याने १४ वर्षांखालील मुलींच्या गटात चमकदार खेळ करून आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमावले आहे. त्यामुळेच तिची विम्बल्डनमधील १४ वर्षांखालील मुलींच्या टेनिस स्पर्धेसाठी निवड झाली होती. दोन महिन्यांपूर्वी अखिल भारतीय टेनिस संघटनेने ‘आयटीएफ वर्ल्ड अंडर-१४’ मुलींच्या टेनिस स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ऐश्वर्या जाधवने चार सामने जिंकून उपांत्य फेरी गाठली होती. त्यामुळे तिची विम्बल्डनसाठी निवड झाली होती.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra aishwarya jadhav performed in wimbledon 2022 aaditya thackeray and sanjay raut praises vkk