लोकसत्ता क्रीडा प्रतिनिधी

पुणे : महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची (एमओए) वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक २ नोव्हेंबर रोजी पुण्यात कॅनट बोट क्लब येथे होणार असून, मतदानासाठी २२ अधिकृत राज्य संघटनाच पात्र ठरल्या आहेत.

‘एमओए’च्या गेल्या निवडणुकीत २७ अधिकृत राज्य संघटनांना मतदानाचा अधिकार मिळाला होता. वार्षिक सर्वसाधारण सभा आणि निवडणूक जाहीर करण्यात आल्यानंतर महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदानास पात्र अधिकृत राज्य संघटनांची यादी महासचिव नामदेव शिरगांवकर यांनी जाहीर केली तेव्हा या वेळी केवळ २२ संघटनाच अधिकृत ठरल्या आहेत.

महाराष्ट्राच्या मातीतील कबड्डी आणि कुस्ती या खेळांच्या दोन राज्य संघटनांसह बॉक्सिंग, जलतरण, हँडबॉल या संघटना या वेळी मतदानासाठी अपात्र ठरल्या आहेत. या संघटनांचे वाद न्यायप्रविष्ट असल्यामुळे त्यांना वगळण्यात आले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे कबड्डी संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनच गेल्या निवडणुकीत अजित पवार यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली होती. राज्य संघटनेचा निवडणुकीचा वाद वर्षभराहून अधिक काळ न्यायप्रविष्ट असून, त्यावर अद्याप निर्णय झालेला नाही.

मतदानासाठी पात्र ठरलेल्या संघटनांची यादी जाहीर झाल्यावर त्यावर २३ सप्टेंबरपर्यंत हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर छाननी समिती निर्णय घेऊन निवडणुकीच्या एक महिना आधी अंतिम अधिकृत राज्य संघटना आणि मतदार यादी जाहीर करणार आहे. पात्र राज्य संघटनांना प्रत्येकी दोन पदाधिकाऱ्यांची नावे पाठवायची आहेत. सहयोगी सदस्य असलेल्या संघटनेतून एकालच सभेसाठी उपस्थित राहता येईल, पण त्याला मतदानाचा अधिकार नसेल. निवृत्त जिल्हा न्यायाधीश बी. डी. गायकवाड यांची मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून निवड करण्यात आली आहे. आणखी एक निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. एन. सरदेसाई हे निवडणूक तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असतील.

पात्र राज्य संघटना : मतदानासाठी पात्र धरण्यात आलेल्या अधिकृत राज्य संघटनांमध्ये अ‍ॅथलेटिक्स, आर्चरी, बॅडमिंटन, बास्केटबॉल, फुटबॉल, जिम्नॅस्टिक, हॉकी, ज्युदो, खो-खो, टेनिस, रायफल, रोईंग, टेबल टेनिस, ट्रायथलॉन, तायक्वांदो, व्हॉलीबॉल, वेटलिफ्टिंग, कॅनाईंग आणि कयाकिंग, तलवारबाजी, वुशू, मॉडर्न पेन्टॅथलॉन आणि रग्बी या खेळांच्या संघटनांचा समावेश आहे.