पीटीआय, अबू धाबी

आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीच्या (आयसीसी) मार्गदर्शक तत्त्वांनुसार एखाद्या माध्यम व्यवस्थापकाला कॅमेरा वापरण्याची परवानगी असते असे म्हणत पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (पीसीबी) सामना निरीक्षक अँडी पायक्रॉफ्ट आणि संघ अधिकाऱ्यांच्या बैठकीचे चित्रीकरण करण्याच्या कृतीचे समर्थन केले.

पाकिस्तानचे प्रशिक्षक मायकल हेसन, कर्णधार सलमान अली आघा, व्यवस्थापक नवीन अक्रम चीमा यांच्यातील बैठकीचे चित्रीकरण केले होते. ‘आयसीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी संजोग गुप्ता यांनी यामुळे ‘पीसीबी’कडून खेळाडू आणि सामना अधिकाऱ्यांचे क्षेत्र (पीएमओए) संदर्भात असलेल्या आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे, असे म्हटले होते. त्याच वेळी गुप्ता यांनी पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितल्याचे नमूद केलेल्या निवेदनाबद्दलही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. पायक्रॉफ्ट यांनी माफी मागितली नसून, संवादातील गैरसमजुतीमुळे निर्माण झालेल्या वादाबद्दल केवळ दिलगिरी व्यक्त केली होती, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.

‘‘माध्यम व्यवस्थापक हे संघाचा भाग असतात आणि त्यांना ‘पीएमओए’मध्ये प्रवेश करण्याची मान्यता आहे. त्यामुळे त्यांची तेथील उपस्थिती हे नियमाचे उल्लंघन होत नाही,’’ असे ‘पीसीबी’चे म्हणे आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेलया माहितीनुसार मार्गदर्शक तत्त्वाचे पालन करण्यात आले नसेल, तर ‘आयसीसी’ने हे प्रकरण लाचलुचपत प्रतिबंध समितीकडे (एसीयू) सोपविण्यास सांगितले आहे.