Mohammad Amir Pushpa style celebration video : पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यावेळी तो चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याने विकेट घेतल्यानंतर केलेले सेलिब्रेशन, ज्याने पाकिस्तानी चाहत्यांसह भारतीय चाहत्यांचीही मनं जिंकली आहेत. खरं तर, आंतरराष्ट्रीय लीग टी-२० मध्ये शारजा वॉरियर्सचा फलंदाज जॉन्सन चार्ल्सची विकेट घेताच त्याने ‘पुष्पा’ अभिनेता अल्लू अर्जुनच्या स्टाईलमध्ये सेलिब्रेशन केले, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या सामन्यात डेझर्ट वायपर्सचा कर्णधार लॉकी फर्ग्युसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने नवा चेंडू मोहम्मद आमिरकडे सोपवला आणि वेगवान गोलंदाजाने कर्णधाराचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध करत संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्याने पहिल्याच षटकात दोन गडी बाद करत प्रतिस्पर्धी संघाचे कंबरडे मोडले. चार्ल्सने त्याच्या षटकातील तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला, पण पुढच्याच चेंडूवर पाकिस्तानी गोलंदाजाने बदला घेतला आणि वेस्ट इंडिजच्या सलामीला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

मोहम्मद आमिरचा पुष्पा स्टाईल सेलिब्रेशनचा व्हिडीओ व्हायरल –

चार्ल्सने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू थेट डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातात गेला. शॉटमध्ये उंची होती, पण तो क्षेत्ररक्षक डॅन लॉरेन्सपासून दूर ठेवू शकला नाही. आमिरने आपली चमकदार गोलंदाजी सुरू ठेवली, जिथे त्याने त्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर अविष्का फर्नांडोला शून्यावर बाद केले आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने नेले.

यानंतर तिसऱ्या षटकात आमिरने आणखी एक विकेट घेतली आणि पुन्हा एकदा पुष्पा सेलिब्रेशनसह विकेट घेतल्याचे सेलिब्रेशन केले. तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर त्याने रोहन मुस्तफाला २ धावांवर बाद केले. मोहम्मद आमिरने पुष्पा स्टाईलने सेलिब्रेशन करण्याची पहिलीच वेळ नव्हती. या अगोदरही त्याने अनेकदा हे सेलिब्रेशन केले आहे. २०२२ मध्ये त्याने टी-२० ब्लास्टमध्ये सॉमरसेट विरुद्ध ग्लुसेस्टरशायरसाठी विकेट घेतल्यावरही असेच केले होते.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohammad amir pulled off the pushpa celebration during the ilt20 tournament in dubai video viral vbm