राज्यभरात आज महाराष्ट्र दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. अनेक अभिनेते तसेच नेत्यांनाही ट्विट करुन महाराष्ट्रातील जनतेला राज्याच्या स्थापनादिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्रातील एकमेव आयपीएल टीम असणाऱ्या मुंबई इंडियन्सनेही फेसबुकवरुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणारा एक खास व्हिडिओ ट्विट केला आहे. या ट्विटमध्ये मुंबईकरांनाही महाराष्ट्र दिनानिमित्त खास शुभेच्छा दिल्या आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई इंडियन्सच्या फेसबुक पेजवरुन पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये मुंबईमधील चित्रिकरण दाखवण्यात आले आहे. यामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळा, मरीन ड्राइव्ह, वडापाव, मुंबईतील टॅक्सी, वांद्रे वरळी सी लिंक, मुंबईची लोकल ट्रेन, चहाची टपरी, पोहे अशा अनेक गोष्टी दाखवण्यात आल्या आहेत. व्हिडिओमध्ये मुंबईच्या संघातील सुर्यकुमार यादव हा मला महाराष्ट्रातील खाद्यपदार्थ खूप आवडत असल्याचे सांगताना दिसतो. मला वडापाव आणि झुणका भारक प्रचंड आवडते असं यादव या व्हिडिओत सांगतो. ‘जेव्हा मला असं काही खायची इच्छा होते तेव्हा मी मित्रांना वांद्रात भेटतो आणि पदार्थांवर ताव मारतो,’ असं यादव सांगतो. मुंबई इंडियन्सच्या संघातील फलंदाज सिद्देश लाडनेही या व्हिडिओमध्ये त्याचे आवडते महाराष्ट्रातील पाच पदार्थ कोणते आहेत हेही यामध्ये सांगितले आहे. वडापाव, मिसळपाव, थालीपीठ, नारळाची वडी आणि पोहे आपल्याला खूप आवडतात असं लाड म्हणाला आहे. व्हिडिओच्या शेवटी मराठमोळ्या अदित्य तरेने मराठीमध्ये मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान ट्विटवरुन महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देणाऱ्या नेत्यांमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू यासारख्या नेत्यांचा समावेश आहे. ट्विटरवर महाराष्ट्र दिनाचीच चर्चा दिसत असून देशातील टॉप ट्रेण्डींग टॉपिक पैकी पहिले दोन टॉपिक हे महाराष्ट्र दिनाचेच आहेत. #महाराष्ट्रदिन आणि #MaharashtraDay हे दोन्ही हॅशटॅग देशात टॉप ट्रेण्ड होताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mumbai indians wishes a happy maharashtra day to fans