Indian Women’s Cricket Team Narendra Modi Meet: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप २०२५ स्पर्धेचा थरार भारतात पार पडला. नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडियममध्ये झालेल्या सामन्यात भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. भारताने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. तर दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करत पहिल्यांदाच वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात दोन्ही संघांमध्ये अटीतटीची लढत रंगली. शेवटी भारतीय संघाने ५२ धावांनी बाजी मारली आणि पहिल्यांदाच जेतेपदाची ट्रॉफी उंचावली. दरम्यान या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय खेळाडू वर्ल्डकपची ट्रॉफी घेऊन दिल्लीत दाखल झाले. सर्व खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली आणि संवाद साधला.
पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकणाऱ्या भारतीय संघातील खेळाडूंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यादरम्यान खेळाडूंसोबत फोटोशूट झालं आणि मोदींनी खेळाडूंसोबत चर्चा केली. दरम्यान मोदींच्या भेटीला प्रतिका रावळ देखील उपस्थित होती. वर्ल्डकप विजयानंतर मेडल न मिळालेली प्रतिका सध्या तुफान चर्चेत आहे. प्रतिका ही वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचा भाग होती. पण सेमीफायनल सामन्याआधी झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यादरम्यान तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे तिला मैदान सोडावं लागलं होतं. तिची दुखापत इतकी गंभीर होती की, तिची दुखापत इतकी गंभीर होती की, तिला संघाबाहेर व्हावं लागलं. तिच्या जागी शफाली वर्माचा संघात समावेश करण्यात आला.
संघाबाहेर झाल्यानंतरही ट्रॉफी उंचावण्याची वेळ आली, त्यावेळी सर्व खेळाडूंनी व्हीलचेअरवर बसवून तिला स्टेजवर नेलं. मोदींजीसोबत चर्चा करताना प्रतिका म्हणाली, “ज्यावेळी मला दुखापतीमुळे संघाबाहेर पडावं लागलं, त्यावेळी संघात अशी चर्चा सुरू होती की, हा वर्ल्डकप आम्हाला प्रतिकासाठी जिंकायचा आहे. संघातील खेळाडूंनी ही गोष्ट माझ्यापासून लपवून ठेवली. ही गोष्ट मला बाहेरून कळली. ज्यावेळी आम्ही वर्ल्डकप जिंकलो, मी जरी अधिकृतरित्या संघाचा भाग नसले, तरी सुद्धा खेळाडूंनी मला व्हीलचेअरवर बसवून स्टेजवर नेलं, मला तोच सन्मान दिला. हा संघ नाही, तर एक कुटूंब आहे. जेव्हा सर्व खेळाडू एकत्र येऊन खेळतात, त्या संघाला पराभूत करणं मुळीच सोपं नसतं. म्हणूनच हा संघ अंतिम सामना जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार होता.”
प्रतिका रावळ ही भारतीय संघातील प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. साखळी फेरीतील सामन्यांमध्ये तिने दमदार कामिगिरी केली. या स्पर्धेत ३०० हून अधिक धावा करून ती भारतीय संघासाठी दुसरी सर्वाधिक धावा करणारी फलंदाज ठरली. यासह संपूर्ण स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत ती चौथ्या स्थानी राहिली. दरम्यान बांगलादेशविरूद्ध झालेल्या साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असताना तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तिला संघाबाहेर व्हावं लागलं.
