Piyush Chawla Predict Shubman Rururaj Team Indias next Virat Rohit : भारतीय संघाचा लेग स्पिनर पियुष चावला याने विश्वास व्यक्त केला आहे की, शुबमन गिल आणि ऋतुराज गायकवाड हे भारतीय क्रिकेट संघाचे पुढचे विराट-रोहित असतील. एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत चावलाने हे वक्तव्य केले. तो म्हणाला शुबमन आणि ऋतुराज यांच्यात प्रचंड प्रतिभा आहे. तसेच हे दोघे शांत स्वभावासाठी ओळखले जातात. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी सोडलेला वारसा पुढे नेण्याचे सर्व गुण या दोन्ही खेळाडूंमध्ये आहेत.
विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ती वेळ दूर नाही जेव्हा हे दोन्ही दिग्गज कसोटी आणि वनडे क्रिकेटमधून निरोप घेतील. अशा स्थितीत भारतीय चाहत्यांच्या मनात एक प्रश्न नक्कीच येत असेल की कोहली आणि रोहितनंतर त्यांची जागा कोण घेऊ शकतं? या प्रश्नाचे उत्तर भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फिरकीपटू पियुष चावलाने देण्याचे काम केले आहे.
शुबमन-ऋतुराज भावी विराट-रोहित –
शुभंकर मिश्राच्या यूट्यूब चॅनलवर बोलत असताना पियुष चावलाने सांगितले की शुबमन आणि ऋतुराज हे टीम इंडियाचे भावी विराट कोहली आणि रोहित शर्मा असतील. कारण विराट कोहली आणि रोहित शर्मासारख्या दिग्गजांची जागा घेणे अशक्य आहे, जसे आजपर्यंत कोणीही सचिन तेंडुलकर आणि सुनील गावसकरसारख्या महान फलंदाजांची जागा घेऊ शकले नाही. मात्र, एक खेळाडू निघून गेल्यावर दुसरा खेळाडू त्याच पद्धतीने कामाचा भार स्वीकारतो हे नक्की.
हेही वाचा – भलत्याच आकाराची बॅट वापरल्याने इंग्लंडमधल्या काउंटीत इसेक्सला फटका; काय आहेत बॅटच्या आकाराचे नियम?
ऋतुराज गायकवाडसाठी पुढील काळ सोपा नाही –
या संवादादरम्यान पीयूष चावलाने देखील कबूल केले की, “ऋतुराज गायकवाडसाठी पुढील काळ सोपा नाही. कारण तो संघात स्थिर नसून आत-बाहेर होत असतो. पण संघर्षाच्या दिवसांत हे सर्व सुरू राहते, असेही तो म्हणाला. तसेच ऋतुराज गायकवाडला संघात जेव्हा-जेव्हा संधी मिळाली, तेव्हा त्यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. तो खूप खास खेळाडू आहे.”
हेही वाचा – Duleep Trophy 2024 : गॉगल घालून बॅटिंगला उतरला, भोपळ्यासह तंबूत परतल्याने श्रेयस अय्यर होतोय ट्रोल
शुबमन गिल तंत्रशुद्ध फलंदाज –
पियुष चावला पुढे म्हणाला, “शुबमन गिल हा त्याच्या तंत्रशुद्ध फलंदाजीसाठी ओळखला जातो. तुम्हाला माहित आहे की जर एखादा फलंदाज खराब फॉर्ममधून जात असेल, तर सहसा त्याचे तंत्र कामी येते आणि कठीण परिस्थितीतून बाहेर पडण्यास मदत करते. तुम्हाला आठवत असेल तर, ज्या फलंदाजाकडे उत्तम तंत्र आहे. फार काळ वाईट फॉर्ममध्ये जाणार नाही. त्यामुळे मला वाटतं शुबमन-ऋतुराज हे भावी विराट-रोहित असतील.”