वृत्तसंस्था, नवी दिल्ली
भारताच्या विकसित राष्ट्र बनण्याच्या प्रवासात खेळ हा महत्त्वाचा पैलू असून देशातील खेळांच्या सर्वांगीण विकासासाठी नवे राष्ट्रीय क्रीडा धोरण निर्णायक ठरेल, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या धोरणामुळे शालेय खेळांपासून ते ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास अधिक सुकर होण्यास मदत होईल, असे मतही मोदींनी व्यक्त केले.
स्वातंत्र्य दिनानिमित्त लाल किल्ल्यावर आयोजित सोहळ्यातील भाषणादरम्यान पंतप्रधानांनी भारतीय क्रीडाक्षेत्राबाबतही आपले मत मांडले. खेळांतही भारताने मोठी प्रगती केली असून आता क्रीडाक्षेत्राकडे कारकीर्द घडविण्याचा उत्तम पर्याय म्हणूनही पाहिले जात असल्याचे मोदी म्हणाले.
‘‘राष्ट्राच्या विकासात खेळांची भूमिकाही महत्त्वाची असते. पूर्वी मुले अभ्यास सोडून खेळाला अधिक वेळ देत असल्यास पालकांकडून त्यांना ओरडा मिळायचा. मात्र, आता गोष्टी बदलल्या आहेत. मुले खेळांमध्ये रस घेतल्यास पालकांना आनंद होतो. भारतात खेळांना आता इतके महत्त्व दिले जात असल्याचा मला अभिमान वाटतो. उज्ज्वल भविष्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची बाब आहे,’’ असे मोदी यांनी सांगितले. या सोहळ्याला ऑलिम्पिक पदकविजेत्या मनू भाकरसह क्रीडाक्षेत्रातील मान्यवरही उपस्थित होते.
ऑलिम्पिक यजमानपदाचे स्वप्न पाहणाऱ्या सरकारने काहीच दिवसांपूर्वी क्रीडा विधेयक संसदेसमोर मांडून ते विरोधकांशी चर्चेविनाच मंजूरही करून घेतले. क्रीडा व्यवस्थापनात पारदर्शकता, खेळाडू कल्याण आणि जागतिक मानांकनाशी सुसंगतता आणण्याच्या दिशेने उचललेले एक आश्वासक पाऊल म्हणून या विधेयकाकडे बघितले जात आहे.
‘‘खेळांना प्रोत्साहन आणि चालना देण्यासाठी, आम्ही अनेक दशकांनंतर राष्ट्रीय क्रीडा धोरण आणले आहे. यामुळे शाळेपासून ते ऑलिम्पिकपर्यंत खेळांचा विकास सुनिश्चित होईल. आम्ही एक परिसंस्था विकसित करू, जी देशात सर्वदूर पोहोचेल आणि क्रीडा प्रशिक्षण, तंदुरुस्ती, पायाभूत सुविधा अशा सगळ्याच गोष्टींवर काम करेल. क्रीडाक्षेत्रात आणखी मोठी मजल मारण्याचे देशाचे लक्ष्य आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत,’’ असेही मोदी यांनी नमूद केले.
भारताला ऑलिम्पिकमध्ये अद्याप एकदाही १० पदकांचा आकडा पार करता आलेला नाही. २०२१ साली झालेल्या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताने सर्वाधिक सात पदके मिळवली होती, ज्यात भालाफेकपटू नीरज चोप्राच्या सुवर्णपदकाचा समावेश होता. मात्र, भविष्यात यात सुधारणा होण्याचा पंतप्रधानांना विश्वास आहे. यासाठी तंदुरुस्ती हा निर्णायक घटक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
‘‘तंदुरुस्ती आणि खेळांबद्दल बोलतानाच, मला स्थूलतेबाबतही बोलायचे आहे. ही देशासाठी मोठी समस्या आहे. भविष्यात प्रत्येक तिसरा व्यक्ती लठ्ठ असण्याची शक्यता आहे. स्थूलतेविरुद्धचे हे युद्ध जिंकण्यासाठी आपल्याला तेलाचा वापर कमी करावा लागेल,’’ असे मोदी यांनी सांगितले.