पीटीआय, नवी दिल्ली

जूनमध्ये होणाऱ्या ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड या महिनाअखेरीस अपेक्षित आहे. संघ निवडताना निवड समितीला काही अवघड निर्णय घ्यावे लागणार हे निश्चित आहे. विशेषत: यशस्वी जैस्वाल आणि शुभमन गिल या सलामीवीरांपैकी कोणाला संघात स्थान मिळते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी १ मेपर्यंत १५ सदस्यीय संघ पाठविण्याची मुदत दिली आहे. त्यानंतर महिनाभराने स्पर्धा असल्यामुळे निवड समितीला सर्व सदस्य हे शंभर टक्के तंदुरुस्त असतील आणि पुढे राहतील याची काळजी घ्यावी लागणार आहे. सध्या सुरू असलेल्या ‘आयपीएल’मध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या नव्या चेहऱ्यांना पसंती मिळण्याची शक्यता कमीच असल्याचे मानले जात आहे.

‘‘संघ निवडताना यावेळी कुठलेही प्रयोग केले जाणार नाहीत. जे खेळाडू देशासाठी खेळले आहेत आणि ज्यांनी आंतरराष्ट्रीय ट्वेन्टी-२० सामन्यांत सातत्य राखले आहे, त्यांचाच संघ निवडीसाठी विचार केला जाणार आहे. ‘आयपीएल’मध्ये या खेळाडूंची कामगिरी चांगली झाली असेल, तर त्यांच्यासाठी तो बोनस ठरेल,’’ असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) सूत्राने सांगितले.

हेही वाचा >>>KKR vs RR : ‘जर हे शतक विराटने झळकावले असते तर…’, बटलरच्या शतकावर हरभजन सिंगने सांगितली मोठी गोष्ट

‘आयपीएल’दरम्यान निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर, प्रशिक्षक राहुल द्रविड, कर्णधार रोहित शर्मा आणि ‘बीसीसीआय’ पदाधिकारी यांच्यात बैठक झाल्याचे समोर येत असून, यामध्ये प्रामुख्याने हार्दिक पंडय़ाबाबत चर्चा झाल्याचे समजते. आता सलामीला, अष्टपैलू आणि विजयवीर कोण, असे प्रश्न निवड समितीसमोर आहेत. यासाठी गिल, जैस्वाल, शिवम दुबे, रिंकू सिंह अशी नावे समोर आहेत. गिल व जैस्वाल दोघांची यापूर्वी देशासाठीची कामगिरी चांगलीच राहिली आहे. त्यामुळे दोघांपैकी एकाची निवड करायची की दोघांना संघात स्थान द्यायचे, यावर निवड समितीच्या प्रत्यक्ष बैठकीदरम्यान चर्चा रंगू शकते.

यष्टिरक्षकाबाबत तेच..

फलंदाजांबाबतचा प्रश्न निकालात निघत नाही, तोच यष्टिरक्षक कोण हा प्रश्न पुढे येतो. मुख्य यष्टिरक्षक म्हणून ऋषभ पंतला पसंती मिळणार हे जवळपास निश्चित आहे. दुसऱ्या यष्टिरक्षकाच्या स्थानासाठी संजू सॅमसन, जितेश शर्मा, केएल राहुल आणि इशान किशन यांच्याकडून आव्हान मिळू शकते. राहुल आणि इशान दोघेही आघाडीच्या फळीतील फलंदाज आहेत. यंदाच्या ‘आयपीएल’मध्येही ते आघाडीच्या फळीतच खेळले आहेत. मधल्या फळीत त्यांची कामगिरी पाहण्याची संधीच निवड समितीला मिळालेली नाही. त्यामुळे सध्या सॅमसनचे पारडे जड आहे.

थेट निवड कोणाची?

रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमरा, रवींद्र जडेजा, ऋषभ पंत, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव हे नऊ खेळाडू शंभर टक्के तंदुरुस्त असतील, तर त्यांची थेट निवड अपेक्षित आहे. यातही अगदीच विचार करायचा झाला, तर सिराजच्या निवडीबाबत चर्चा होऊ शकते. यंदाच्या ‘आयपीएल’मध्ये तो अद्याप प्रभाव पाडू शकलेला नाही.

राखीव खेळाडूंत नवोदितांचा समावेश?

‘आयपीएल’मधील नव्या चेहऱ्यांना विश्वचषकात संधी मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र, राखीव खेळाडू किंवा नेटमध्ये गोलंदाजी करण्यासाठी ‘बीसीसीआय’ मयांक यादव, हर्षित राणा, आकाश मढवाल यांना सामावून घेऊ शकेल. एकंदर चित्र बघता सध्या तरी सहा फलंदाज, चार अष्टपैलू, चार वेगवान गोलंदाज, तीन फिरकी गोलंदाज आणि तीन यष्टिरक्षक अशी २० सदस्यीय संघाची निवड होऊ शकते. यातील पाच खेळाडू राखीव असतील.

फिरकीसाठी उपलब्ध पर्याय

चायनामन कुलदीप यादवची निवड सध्या अंतिम मानली जात आहे. आता त्याच्या जोडीसाठी यजुवेंद्र चहल, रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांच्यात स्पर्धा होईल. चहल नऊ वर्षे संघाबरोबर आहे, पण अद्याप त्याला एकदाही ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत संधी मिळालेली नाही.