Duleep Trophy Final Central Zone vs Western Zone: दुलीप ट्रॉफी २०२५च्या अंतिम सामन्यात रजत पाटीदारच्या नेतृत्त्वाखाली सेंट्रल झोन संघाने ६ विकेट्सने विजय मिळवला. सेंट्रल झोनने दुलीप ट्रॉफीवर कब्जा केला आहे. तब्बल ११ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सेंट्रल झोन संघाने दुलीप ट्रॉफी पटकावली आहे. दुलीप ट्रॉफीच्या अंतिम फेरीत सेंट्रल झोन संघाला विजयासाठी फक्त ६५ धावांची आवश्यकता होती, जी त्यांनी ४ विकेट्स गमावून साध्य केली.

दुलीप ट्रॉफी विजयाचा हिरो यश राठोड ठरला, ज्याने १९४ धावांची शानदार खेळी केली. रजत पाटीदारने पुन्हा एकदा आपल्या उत्कृष्ट नेतृत्त्वाच्या जोरावर अजून एक संघाचा जेतेपदाचा दुष्काळ संपवला आहे. त्याच्या नेतृत्वाखाली आरसीबीने आयपीएल २०२५ चे जेतेपद जिंकलं आणि आता त्याने दुलीप ट्रॉफीमध्ये संघाला विजेतेपद मिळवून दिले आहे.

सेंट्रल झोन संघाने संपवला दुलीप ट्रॉफी जेतेपदाचा दुष्काळ

बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सलन्स ग्राउंडवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात, साऊथ झोन संघ पहिल्या डावात फक्त १४९ धावांवर बाद झाला. फिरकी गोलंदाज सारांश जैनने ५ आणि कुमार कार्तिकेयने ४ बळी घेत सेंट्रल झोनचा विजय पहिल्याच दिवशी निश्चित केला. यानंतर, सेंट्रल झोनच्या फलंदाजांनी या विजयावर शिक्कामोर्तब केलं, ज्यांनी त्यांच्या संघाला पहिल्या डावात ५११ धावांपर्यंत पोहोचवलं. कर्णधार रजत पाटीदारने शानदार १०१ धावा केल्या. यश राठोडने १९४ धावांची वादळी खेळी केली.

सरांश जैननेही ६९ धावा करत आपल्या चमकदार कामगिरी केली. सलामीवीर दानिश मालेवारनेही ५३ धावांची खेळी केली. दुसऱ्या डावात साऊथ झोनने ४२६ धावा करून सामन्यात पुनरागमन केलं. अंकित शर्माने ९९, आंद्रे सिद्धार्थने ८४ धावा केल्या पण शेवटी सेंट्रल झोनच्या संघाने सामना सहज जिंकला. यश राठोडने संघाला विजयासाठी ३ धावांची गरज असताना विजयी चौकार लगावत सामना संघाच्या नावे केला.

पहिल्या डावात द्विशतक हुकलेल्या यश राठोडला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. सेंट्रल झोनचा अष्टपैलू सारांश जैनला मालिकावीर म्हणून निवडण्यात आले. सारांश जैनने या स्पर्धेत १३६ धावा केल्या आणि १६ विकेट्सही घेतल्या. कर्णधार रजत पाटीदारनेही स्पर्धेत आपला दबदबा राखला, त्याने ३ सामन्यांमध्ये ७६ पेक्षा जास्त सरासरीने ३८२ धावा केल्या. रजतचा स्ट्राइक रेटही ९६ पेक्षा जास्त होता, जी लक्षवेधी गोष्ट होती.

यश राठोडने स्पर्धेत १२४ पेक्षा जास्त सरासरीने ३७४ धावा केल्या. दानिश मालेवारनेही ३ सामन्यांमध्ये ७० पेक्षा जास्त सरासरीने ३५२ धावा केल्या. बीसीसीआयने सेंट्रल झोन संघाच्या विजयी क्षणाचा व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.