R Ashwin and Ravindra Jadeja Record Break Partnership: भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये खेळवला जात आहे. या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाची सुरूवात फारच खराब झाली. पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाच्या कर्णधाराने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, जो गोलंदाजांनी योग्य असल्याचे दाखवून दिले. पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रापर्यंत भारताने ६ बाद १४४ धावा अशी धावसंख्या होतीय. त्यात यशस्वी जैस्वालेन एकट्याने ५६ धावा केल्या होत्या. यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या जोडीने संघाला या गंभीर परिस्थितीतून बाहेर काढले आणि ७व्या विकेटसाठी विक्रमी भागीदारीही रचली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

India vs Bangladesh: अश्विन-जडेजाने मोडला २४ वर्षे जुना विक्रम

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा फलंदाजीसाठी मैदानात आले तेव्हा बांगलादेशच्या गोलंदाजांचे दडपण भारतीय संघावर स्पष्टपणे दिसत होते. यानंतर अश्विनने आक्रमक पवित्रा घेत पहिल्या षटकापासूनच बांगलादेशच्या गोलंदाजांवर हल्ला चढवण्यास सुरुवात केली. त्याला जडेजानेही चांगली साथ दिली आणि संघाची धावसंख्या झटपट २०० धावांच्या पुढे गेली. दोघांनी मिळून ७व्या विकेटसाठी १५० हून अधिक धावांची भागीदारी करताना २४ वर्ष जुना विक्रमही मोडीत काढला.

यापूर्वी, भारताकडून बांगलादेशविरुद्ध ७व्या विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विक्रम सौरव गांगुली आणि सुनील जोशी यांच्या नावावर होता, ज्यांनी २००० मध्ये ढाका कसोटी सामन्यात १२१ धावांची भागीदारी केली होती, जी आता अश्विनच्या आणि जडेजाच्या नावावर आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये, २०२१ पासून भारतीय संघाच्या खालच्या फळीच्या जोरावर भारताने खूप चांगली कामगिरी केली आहे, ज्यामध्ये टीम इंडियाकडून ७ व्या किंवा खालच्या विकेटसाठी ५० किंवा त्याहून अधिक धावा २५ भागीदारी केल्या गेल्या आहेत. या बाबतीत, फक्त इंग्लंड संघ भारतापेक्षा पुढे आहे, ज्यांच्या संघाने ५० पेक्षा जास्त धावांच्या ३१ भागीदारी केल्या आहेत.

सातव्या विकेटसाठी भारत वि बांगलादेश सामन्यात भागीदारी रचत सर्वाधिक धावा

१९५* धावा – रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा – चेन्नई २०२४
१२१ धावा – सौरव गांगुली आणि सुनील जोशी – ढाका २०००
११८ धावा – रवींद्र जडेजा आणि वृद्धीमान साहा – हैदराबाद २०१७

बांगलादेशविरूद्ध मोठी कामगिरी

रवींद्र जडेजा आणि आर अश्विन ही जोडी आता बांगलादेशविरुद्ध भारतासाठी सातव्या किंवा त्याहून कमी विकेटसाठी सर्वाधिक भागीदारी करणारी जोडी बनली आहे. यापूर्वी हा विक्रम सचिन तेंडुलकर आणि झहीर खानच्या नावावर होता. २००४ मध्ये ढाका कसोटीत सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांनी १०व्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली होती. पण आता या यादीत रवींद्र जडेजा आणि आर अश्विन पुढे गेले आहेत. म्हणजेच जडेजा आणि अश्विनने सचिन तेंडुलकर आणि झहीर खान यांचा २० वर्ष जुना विक्रम मोडला आहे. त्याच वेळी, बांगलादेशविरुद्ध ही पहिलीच वेळ आहे जेव्हा भारतीय फलंदाजांनी सातव्या विकेटसाठी किंवा त्याहून खालच्या विकेटसाठी १५० अधिक धावांची भागीदारी रचली.

घरच्या मैदानावर ७ किंवा खालच्या विकेटसाठी भागीदारी करत सर्वाधिक धावा
१. कपिल देव आणि सय्यद किरमानी – १४ सामन्यांमध्ये ६१७ धावा
२. आर अश्विन आणि रवींद्र जडेजा – १४ सामन्यांमध्ये ५००* धावा
३. एमएस धोनी आणि व्हीव्हीएस लक्ष्मण – ३ सामन्यांमध्ये ४८६ धावा
४. सय्यद किरमाणी आणि रवी शास्त्री – ८ सामन्यांमध्ये ४६२ धावा
५. रवींद्र जडेजा आणि वृद्धिमान साहा – ९ सामन्यांमध्ये ४२१ धावा

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ravichandran ashwin and ravindra jadeja record break 195 runs partnership for 7th wicket broke many records in ind vs ban chennai test bdg