PBKS vs MI Qualifier: रविवारी संध्याकाळी पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत झोकात अंतिम फेरीत प्रवेश केला. आता अंतिम फेरीत पंजाब किंग्जचा सामना तुल्यबळ अशा आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरशी होणार आहे. या स्पर्धेच्या साखळी फेरीत पहिल्या स्थानी पंजाब तर दुसऱ्या स्थानी बंगळुरूचा संघ राहिला होता. दोन्ही संघांनी ९ सामन्यांतील विजयासह १९ गुण मिळवले होते. त्यामुळे या दोन्ही संघांमधला अंतिम सामना म्हणजे कडवा संघर्ष असण्याची दाट शक्यता आहे. मात्र, मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयानंतर श्रेयस अय्यरनं पहिल्या क्वालिफायरमधील पराभवानंतर दिलेल्या एका इशाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल होऊ लागला आहे.

काय घडलं होतं RCB विरुद्धच्या क्वालिफायरमध्ये?

रॉयल चॅलेंजर्स बँगलोर अर्थात RCB विरुद्ध पंजाब किंग्ज अर्थात PBKS हा पहिला क्वालिफायर सामना २९ मे रोजी खेळवला गेला. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरनं पंजाब किंग्जचा सहज पराभव करत थेट अंतिम सामन्यात धडक मारली. त्यामुळे पंजाबसाठी दुसरा क्वालिफायर सामना खेळणं क्रमप्राप्त झालं. तिकडे एलिमिनेटर सामन्यात गुदरात टायटन्सला पराभूत करून मुंबई इंडियन्स क्वालिफायरमध्ये दाखल झाली होती. पण रविवारी झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं २०३ धावा करूनही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आणि यात सर्वात मोठं योगदान होतं ते कर्णधार श्रेयस अय्यरचं!

पहिल्या क्वालिफायरमधील पराभवानंतर श्रेयस अय्यरनं आणखी एका क्वालिफायरची संधी असल्याबाबत बोलताना सूचक विधान केलं होतं. “आम्ही एक लढाई हरलोय, युद्ध नव्हे” असं श्रेयस अय्यर म्हणाला होता. त्याच्या या विधानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

श्रेयसनं टीमलाही अशाच प्रकारचा सल्ला दिला होता. “सर्व कल्पना आणि अंदाज डस्टबिनमध्ये टाकून द्या आणि आपण कुठे कमी पडलो, चुकले याचा फार विचार करू नका. कारण या पर्वात पहिल्या सामन्यापासूनच आपण खूप चांगल्या दर्जाचं क्रिकेट खेळत आहोत. आपला खेळण्यातला दृष्टीकोनी प्रचंड सकारात्मक आहे. त्यामुळे एक सामना आपली संघ म्हणून कामगिरी ठरवू शकत नाही”, असं श्रेयसनं सांगितलं होतं.

मुंबई इंडियन्सविरुद्धच्या विजयानंतर काय म्हणाला श्रेयस अय्यर?

मुंबई इंडियन्सचं २०३ धावांचं आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर श्रेयस अय्यरनं या यशाचं गमक सांगितलं आहे. “मला असे मोठे सामने खेळायला आवडतं आणि मी नेहमी स्वत:ला आणि माझ्या संघसहकाऱ्यांना हेच सांगत असतो की जेवढा मोठा सामना, तेवढे तुम्ही शांतपणे खेळा आणि तुम्हाला सर्वोत्तम निकाल मिळेल. आज मी मैदानावर हायपर न होता माझा श्वासोच्छवास नियंत्रित करण्यावर जास्त लक्ष केंद्रीत केलं होतं. जेव्हा मी फलंदाजीला गेलो, तेव्हा मला काही काळ खेळपट्टीवर घालवणं गरजेचं होतं. समोरचा फलंदाज चांगली फटकेबाजी करत होता. मला हे माहिती होतं की जेवढा जास्त वेळ मी खेळपट्टीवर घालवेन, तेवढा माझा खेळ चांगला होईल”, असंही श्रेयस अय्यरनं सांगितलं.

वर्षRCBPBKS
२००८सातवे स्थानक्वालिफायर
२००९उपविजेतेपाचवे स्थान
२०१०क्वालिफायरआठवे स्थान
२०११उपविजेतेपाचवे स्थान
२०१२पाचवे स्थानसहावे स्थान
२०१३पाचवे स्थानसहावे स्थान
२०१४सातवे स्थानउपविजेते
२०१५क्वालिफायरआठवे स्थान
२०१६उपविजेतेआठवे स्थान
२०१७आठवे स्थानपाचवे स्थान
२०१८सहावे स्थानसातवे स्थान
२०१९आठवे स्थानसहावे स्थान
२०२०चौथे स्थानसहावे स्थान
२०२१क्वालिफायरसहावे स्थान
२०२२चौथे स्थानसहावे स्थान
२०२३सहावे स्थानआठवे स्थान
२०२४चौथे स्थाननववे स्थान
२०२५अंतिम फेरीअंतिम फेरी

काय झालं क्वालिफायर सामन्यात?

मुंबई इंडियन्सनं जॉनी बेअरस्टो (३८), तिलक वर्मा (४४) आणि सूर्यकुमार यादव (४४) यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर PBKS समोर IPL Final मध्ये जाण्यासाठी तब्बल २०४ धावांचं आव्हान ठेवलं. तेव्हा किंग्ज इलेव्हन पंजाबसाठी हे आव्हान कठीण ठरेल असं सगळ्यांनाच वाटलं होतं. कारण मुंबई इंडियन्स आजतागायत २०० धावा केल्यानंतर पराभूत झालेली नव्हती. पण रविवारी किंग्ज इलेव्हननं कर्णधार श्रेयस अय्यरच्या तुफानी खेळीच्या जोरावर हेही करून दाखवलं!

रविवारी झालेल्या क्वालिफायरमध्ये श्रेयस अय्यरनं ४१ चेंडूंत ८७ धावा कुटल्या. यात ५ चौकार आणि तब्बल ८ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. श्रेयस अय्यरसह जॉश इंग्लिस (३८) आणि नेहाल वढेरा (४८) यांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीची अक्षरश: पिसं काढली. २०४ धावांचं आव्हान पंजाबनं एक षटक राखून फक्त ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केलं. मुंबई इंडियन्सचा हुकमी एक्का जसप्रीत बुमराहला एकही विकेट मिळाली नाही. उलट त्याच्या ४ षटकांमध्ये पंजाबनं तब्बल ४० धावा कुटल्या!