पीटीआय, नवी दिल्ली

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गुजरात टायटन्स संघाने इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) क्रिकेटच्या पुढील हंगामासाठी सलामीवीर शुभमन गिलकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. तारांकित अष्टपैलू हार्दिक पंडय़ा मुंबई इंडियन्सकडे परतल्याने गुजरातला नेतृत्वबदल करावा लागला. तसेच मुंबईच्या संघाने ऑस्ट्रेलियन अष्टपैलू कॅमरुन ग्रीनला रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु संघाकडे पाठवले आहे.‘आयपीएल’मधील दहाही संघांनी आगामी हंगामासाठी कायम ठेवलेले खेळाडू आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी रविवारी जाहीर केली होती. यात गुजरातने हार्दिकला संघात कायम ठेवले होते. मात्र, पडद्यामागे हार्दिक गुजरातकडून मुंबईकडे परतण्याची प्रक्रिया पूर्ण झाली होती. सोमवारी मुंबईचा संघ, तसेच ‘आयपीएल’ने याबाबत अधिकृत घोषणा केली. हार्दिकच्या नेतृत्वाखाली गुजरातने २०२२च्या हंगामात ‘आयपीएल’चे जेतेपद पटकावले होते, तर गतहंगामात हा संघ उपविजेता ठरला होता.

परंतु यानंतरही हार्दिकने ‘आयपीएल’मधील आपला पहिला संघ मुंबईकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर गुजरात संघाने त्वरित गिलची कर्णधार म्हणून घोषणा केली. २४ वर्षीय गिलने गेल्या हंगामात तब्बल ८९० धावा केल्या होत्या.दरम्यान, हार्दिकने मुंबई संघात परतल्यानंतर सुरुवातीपासूनच्या प्रवासाची चित्रफीत प्रसिद्ध करतानाच आपल्या भावना समाजमाध्यमांवर व्यक्त केल्या. ‘‘खूप आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. मुंबई. वानखेडे. पलटण. परत येऊन छान वाटत आहे,’’ असे हार्दिक म्हणाला.गुजरात टायटन्सच्या कर्णधारपदी निवड होणे ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. आमच्या संघाने गेल्या दोन हंगामांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. आता कर्णधार म्हणून ही यशस्वी कामगिरी सुरू ठेवण्यासाठी आणि आकर्षक शैलीतील क्रिकेट खेळण्यासाठी मी उत्सुक आहे. – शुभमन गिल

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shubman gill decision to captain gujarat after hardik pandya returned to mumbai indians amy