Shubman Gill Journey From u19 Cricket to India Test Captain: भारतीय क्रिकेट संघाचा प्रिन्स म्हणून ओळख निर्माण केलेला शुबमन गिल आता कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्माचा उत्तराधिकारी असणार आहे. आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी गिल भारतीय कसोटी संघाचा कर्णधार असेल. तरूण तडफदार खेळाडू म्हणून संघात आलेल्या गिलने काही वेळातच एक उत्कृष्ट प्रतिभावान फलंदाज म्हणून आपलं संघात स्थान निर्माण केलं. त्याची तंत्रशुद्ध फलंदाजी, कमालीचे स्ट्रोकप्ले आणि दबाव असतानाही कामगिरी करण्याची त्याची क्षमता यामुळे गिलने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.

अगदी कमी कालावधीत, गिलने भारताच्या भविष्यातील क्रिकेट सुपरस्टारपैकी एक म्हणून समोर येत आहे. याचदरम्यान आता वयाच्या २५ व्या वर्षी क्रिकेटमधील सर्वात मोठा फॉरमॅट कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्त्व करण्याची मोठी जबाबदारी दिली आहे. गिलचा क्रिकेटमधील प्रवास, त्याचे पदार्पण आणि आता भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व याचा आढावा घेऊया.

वयाच्या २५व्या वर्षी भारतीय कसोटी संघाचे नेतृत्त्व करणाऱ्या गिलचा जन्म ८ सप्टेंबर १९९९ मध्ये पंजाबमधील फजिल्का येथे झाला. लहानपणापासूनच गिलला क्रिकेटचं भारी वेड होतं. त्याचे वडील, माजी क्रिकेटपटू लखविंदर सिंग गिल यांनी त्याच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गिलच्या क्रिकेटसाठी त्याच्या वडिलांनी त्यांचं मूळ गाव सोडून मोहाली क्रिकेट स्टेडियमजवळ घर घेतलं आणि तिथे त्याने क्रिकेटची धुळाक्षर गिरावली. क्रिकेटप्रेमी कुटुंबात वाढलेल्या शुबमनला क्रिकेट खेळण्यासाठी कुटुंबाकडून चांगला पाठिंबा मिळाला. याशिवाय शुबमन गिलने भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगकडे क्रिकेटमधील बारकावे शिकले आणि स्वत:ला तिन्ही फॉरमॅटसाठी सज्ज केलं.

गिलने पंजाबमध्ये क्रिकेटचे धडे गिरवले आणि आपल्या फलंदाजीला आकार दिला. गिलने अंडर-१९ क्रिकेटमध्ये भारताचे नेतृत्त्व केले आहे. २०१८ च्या आयसीसी अंडर-१९ क्रिकेट विश्वचषकात तो एक उत्कृष्ट खेळाडू ठरला, जिथे त्याने भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेत शुबमन सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याच्या या कामगिरीने त्याने निवडकर्त्यांचे आणि क्रिकेटप्रेमींचं लक्ष वेधून घेतलं आणि प्रसिद्धीझोतात आला.

शुबमन गिलची देशांतर्गत क्रिकेटमधील कारकिर्द

शुबमन गिलच्या देशांतर्गत कारकिर्दीची सुरुवात २०१७-१८ च्या रणजी ट्रॉफीमध्ये पंजाब संघात निवडीसह झाली. त्याने त्याच्या तंत्राने आणि मोठे डाव खेळण्याच्या क्षमतेने प्रभावित केले. देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला भारतीय संघामध्ये स्थान मिळण्यासाठी दावेदारी सिद्ध केली. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील गिलच्या दमदार कामगिरीमुळे राष्ट्रीय स्तरावरील कॉल-अपसाठी त्याचा दावा आणखी मजबूत झाला.

गिल आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) कडूनही खेळला, जिथे त्याने जगातील काही सर्वोत्तम गोलंदाजांविरुद्ध आपलं कौशल्य दाखवले. आयपीएलमधील त्याची कामगिरी त्याला एक चांगला खेळाडू म्हणून विकसित होण्यासाठी महत्त्वाची ठरली, ज्यामुळे त्याला उच्च दर्जाच्या क्रिकेटची ओळख मिळाली.

भारतीय संघात पदार्पण

शुबमन गिलने जानेवारी २०१९ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेदरम्यान भारतासाठी एकदिवसीय आंतरराष्ट्रीय (ODI) क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सर्वोच्च स्तरावर खेळण्याचे आव्हान असूनही गिलने त्याच्या संयम आणि शांत स्वभावाने प्रभावित केले. कसोटी क्रिकेटमधील त्याच्या पदार्पणाने चाहत्यांचे आणि तज्ञांचे लक्ष खरोखरच वेधून घेतले.

गिलने डिसेंबर २०२० मध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतासाठी कसोटी पदार्पण केले. दिग्गज खेळाडू विराट कोहलीसह इतर काही दुखापतग्रस्त खेळाडूंच्या जागी संघात येताच, शुबमनने दबाव असताना कामगिरी केली. सिडनी क्रिकेट ग्राउंडवर झालेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या दुसऱ्या डावात त्याने ४५ धावांची खेळी केली, या खेळीने त्याच्या क्रिकेटची चुणूक दाखवून दिली. ऑस्ट्रेलियामध्ये, विशेषतः आव्हानात्मक परिस्थितीत, त्याची तंत्रशुद्ध आणि निर्भय खेळीने त्याचं भारतीय कसोटी संघातील स्थान पक्क केलं.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेत, ब्रिस्बेनमधील गाबा येथे झालेल्या प्रसिद्ध चौथ्या कसोटी सामन्यात गिलचे योगदान भारताच्या ऐतिहासिक विजयात मोलाचे ठरले. या मालिकेतील त्याच्या खेळी भारताच्या विजयी पुनरागमनात महत्त्वपूर्ण ठरल्या. गिलसारख्या सर्व खेळाडूंच्या योगदानासह ऑस्ट्रेलियामध्ये भारताचा पहिलाच मालिका विजय निश्चित केला. परदेशी परिस्थितीत आघाडीवर खेळण्याच्या आणि आक्रमक पण प्रसंगी सावध खेळी करण्याच्या शुबमनच्या क्षमतेमुळे अनेक माजी क्रिकेटपटू आणि तज्ञांकडून त्याचे कौतुक झाले.

पदार्पणापासूनच, गिलने कसोटी क्रिकेटमध्ये आपले स्थान कायम ठेवण्याचा प्रयत्न केला. २०२१ मध्ये इंग्लंडविरुद्धच्या भारताच्या यशस्वी मालिकेत त्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्या आणि बॅकफूट आणि फ्रंटफूट दोन्हीवर खेळण्याची त्याची प्रतिभा दाखवली आहे. त्याच्या शांत आणि संयमामुळे याचबरोबर दबावाखाली मोठ्या खेळी खेळण्याच्या क्षमतेमुळे या दीर्घ स्वरूपाच्या भारताच्या टॉप-ऑर्डरमध्ये त्याने स्थान मिळवले. यानंतर आता गिलच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याला मोठी जबाबदारी देण्यात आली.

शुबमन गिल सध्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचे नेतृत्त्व करतो. त्याच्या नेतृत्त्वाखाली गतवर्षी संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता, तर यंदाही संघ उत्कृष्ट कामगिरीसह गुणतालिकेत पहिल्या स्थानी असून प्लेऑफमध्ये गेला आहे. याशिवाय आयपीएलमध्ये यंदा गिल सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. २०२२ मध्ये ऑरेंज कॅप पटकावल्यानंतर संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू ठरला. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात गेल्यानंतर गुजरात संघाची जबाबदारी त्याच्यावर देण्यात आली. गुजरात संघाचं घरचं मैदान अहमदाबादमधील त्याचा रेकॉर्ड उत्तम आहे. शॉर्ट आर्म पूल हा त्याच्या ठेवणीतील स्ट्रोक आहे. तर फ्लिक करून खेचलेला षटकार अन् कव्हर ड्राईव्हही पाहण्यासारखे असतात.

गिल हा भारतीय क्रिकेट संघातील एक अविभाज्य भाग बनला. याचबरोबर आता तो विविध ब्रँड्सचा चेहरा म्हणून प्रसिद्ध झाला आहे. विविध ब्रँड्ससाठी त्याने जाहिराती केल्या आहेत, अनेक ब्रँड्सचा तो चेहराही आहे.