Sanju Samson Idol: भारताचा टी-२० क्रिकेटमधील सलामीचा फलंदाज संजू सॅमसन गेल्या काही दिवसांपासून तुफान चर्चेत आहे. आयपीएल स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करणारा संजू सॅमसन आगामी हंगामापूर्वी या संघाची साथ सोडणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. यष्टीरक्षक फलंदाज आणि नेतृत्वाचा अनुभव असणारा संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडून चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून खेळणार असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान आर अश्विनला दिलेल्या मुलाखतीत त्याने याबाबत मोठा खुलासा केला आहे. यासह तो कोणाला आदर्श मानतो, याबाबत देखील खुलासा केला आहे.

संजू सॅमसनचा आदर्श कोण?

आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा संजू सॅमसन हा भारतीय संघासाठी डावाची सुरूवात करतो. दरम्यान भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा त्याचा आदर्श आहे. आता संजूने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये रोहितची जागा घेतली आहे. त्यामुळे आपला आदर्श असलेल्या रोहितच्या पावलांवर पाऊल ठेवून टी-२० क्रिकेटमध्ये आपला ठसा उमटवण्याचा त्याचा प्रयत्न असणार आहे.

या मुलाखतीच्या सुरूवातीलाच अश्विनने आयपीएल स्पर्धेबाबत प्रश्न विचारला. अश्विन म्हणाला, “आगामी हंगामात चेन्नई सुपर किंग्स संघाकडून खेळणार आहेस का?” तसेच हसत तो पुढे म्हणाला की, “केरळमध्येच थांब.” या प्रश्नाचं उत्तर देताना संजू सॅमसन म्हणाला की, “केरळमध्ये थांबण्यात काहीच अर्थ नाही, इथे आयपीएलचा संघ नाही.”

तसेच तो पुढे म्हणाला की,”पाहूया पुढे काय होतं, मी सर्वकाही परमेश्वरावर सोडून दिलं आहे.” त्यामुळे संजू सॅमसनने राजस्थान सोडून चेन्नईत जाणार की नाही, याबाबत कुठलीही हिंट दिलेली नाही. या मुलाखतीदरम्यान त्याने राजस्थान रॉयल्स संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचं कौतुकही केलं.

संजू सॅमसनने आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याला राजस्थान रॉयल्स संघाचं नेतृत्व करण्याची देखील संधी मिळाली आहे. त्याने आयपीएल स्पर्धेतील १७७ सामन्यांमध्ये ४७०४ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि २६ अर्धशतकं झळकावली आहेत. तर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ४२ सामन्यांमध्ये त्याने ८६१ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने ३ शतकं आणि २ अर्धशतकं झळकावली आहेत. तर वनडे क्रिकेटमधील १६ सामन्यांमध्ये त्याने ५१० धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १ शतक आणि ३ अर्धशतकं झळकावली आहेत.