India vs Pakistan ICC Cricket World Cup 2023: अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विश्वचषकातील १२ व्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमनेसामने आले आहेत. या सामन्यासाठी चाहते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. गेल्या काही वर्षांत भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळले गेलेले सामने अतिशय रोमांचक होते. या सामन्यात प्रत्येक भारतीय खेळाडू आपले सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करेल, पण चाहत्यांना विराट कोहलीकडून मोठ्या अपेक्षा असतील.

पाकिस्तानसमोर नेहमीचा असते विराटचे आव्हान –

विराट कोहली अनेक मोठ्या प्रसंगी पाकिस्तानी संघाला नडला आहे त्याने आपल्या बॅटने प्रतिस्पर्ध्याचे विजयाचे इरादे धुळीस मिळवले आहेत. दोन्ही देशांच्या हाय व्होल्टेज मॅचेसमध्ये त्याने अनेकदा मॅचविनर असल्याचे सिद्ध केले आहे. कोहली हा पाकिस्तानचा काळ असेल पण पाकिस्तानी खेळाडूंसाठी तो क्रिकेट जगताचा हिरो आहे. याचा प्रत्यय स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

स्टार स्पोर्ट्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये पाकिस्तानी खेळाडू काय म्हणाले?

स्टार स्पोर्ट्सने भारत-पाकिस्तान सामन्याच्या काही तास आधी एक व्हिडिओ शेअर केला होता. ज्यामध्ये पाकिस्तानी खेळाडू विराट कोहलीचे कौतुक करताना दिसत होते. इमाम उल हक म्हणाला, ‘मला विराट कोहलीची मानसिकता खूप आवडते. तो ऑस्ट्रेलियाला स्लेज करतो, संकटात सापडतो. तो कधीही हार मानत नाही. त्याच्यासारखे खेळणारे अनेक असतील, पण त्याची मानसिकता वेगळी आहे.’

विराट कोहलीच्या शॉट्सचा रिझवान आहे चाहता –

विराट कोहलीचे वर्णन करताना शादाब खान म्हणाला, ‘त्याच्या आत भूक आहे, त्याला अधिक चांगले व्हायचे आहे. तो आधीपासूनच एक महान खेळाडू आहे, पण तरीही मी भारतासाठी आणखी काही करावे अशी त्याची इच्छा आहे.’ मोहम्मद रिझवानने कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक केले आणि म्हणाला, ‘एकदा त्याने काही धावा केल्या आणि सेट झाला की त्याचे शॉट्स प्रत्येकापेक्षा वेगळे असतात. तो जगातील सर्व खेळाडूंपेक्षा वेगळा आहे. त्याच्या आजूबाजूलाही कोणी नाही.’

दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –

भारत: शुबमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.

पाकिस्तान : अब्दुल्ला शफीक, इमाम उल हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हरिस रौफ.