टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत टीम इंडियाने निराशाजनक कामगिरी सुरूच ठेवली आहे. दुबईच्या मैदानावर आज भारताला ८ गडी राखून न्यूझीलंडकडून लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. उपांत्य फेरीच्या शर्यतीसाठी अतिमहत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट आणि फिरकीपटू ईश सोधी यांनी केलेल्या शिस्तबद्ध माऱ्यासमोर टीम इंडियाच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. न्यूझीलंडने भारताला २० षटकात ७ बाद ११० धावांवर रोखले. प्रत्युत्तरात सलामीवी डॅरिल मिशेल आणि केन विल्यमसन यांनी दमदार भागीदारी रच न्यूझीलंडच्या विजयावर सहज शिक्कामोर्तब केले. सोधीला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. टी-२० विश्वचषकात न्यूझीलंडने भारताला पराभूत करण्याची परंपरा कायम राखली. या पराभवामुळे भारताची उपांत्य फेरी गाठण्याची आशा धुसर झाली आहे.

न्यूझीलंडचा डाव

भारताच्या छोटेखानी धावसंख्येचा पाठलाग करताना न्यूझीलंडचे सलामीवीर मार्टिन गप्टील आणि डॅरिल मिशेल यांनी आक्रमक सुरुवात केली. झटपट २० धावा बनवल्यानंतर गप्टिलने वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला. पण तो अपयशी ठरला. गप्टिल तंबूत परतल्यानंतर मिशेलने मोर्चा सांभाळला. कप्तान केन विल्यमसनने मिशेलला त्याचा नैसर्गिक खेळ खेळू दिला. या दोघांनी एकेरी, दुहेरी आणि मोक्याच्या क्षणी चौकार-षटकार ठोकत भारतावर दबाव वाढवला. न्यूझीलंड विजयाकडे सहज वाटचाल करत असताना मिशेल बाद झाला. त्याने ४ चौकार आणि ३ षटकारांसह ४९ धावा केल्या. त्यानंतर विल्यमसनने डेव्हॉन कॉन्वेला सोबत घेत १५व्या षटकात न्यूझीलंडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. विल्यमसन ३३ धावांवर नाबाद राहिला.

भारताचा डाव

नियमित सलामीवीरांपेक्षा वेगळा प्रयत्न म्हणून टीम इंडियाने इशान किशन आणि केएल राहुल ही जोडी आजमावून पाहिली. पण न्यूझीलंडने त्यांचा प्रयोग अयशस्वी ठरवला. वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने इशानला (४) तर पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात टीम साउदीने राहुलला झेलबाद केले. राहुलने ३ चौकारांसह १८ धावा केल्या. पॉवरप्लेमध्ये भारताला २ बाद ३५ धावा करता आल्या. तिसऱ्या क्रमांकावर आलेला रोहित शर्मा आणि कप्तान विराट कोहलीकडून आधाराची अपेक्षा होती, पण फिरकीरपटू ईश सोधीने दोघांना जाळ्यात अडकले. त्यानंतर ऋषभ पंतही (१२) माघारी परतला. संथ खेळणारा हार्दिकही १९व्या षटकात माघारी परतला. शेवटच्या षटकात रवींद्र जडेजाने ११ धावा कुटल्यामुळे भारताा शंभरीपार पोहोचता आले. डावाच्या शेवटच्या षटकात भारताने शतक पूर्ण केले. या षटकात भारताने ११ धावा काढल्या. २० षटकात भारताने ७ बाद ११० धावा केल्या. रवींद्र जडेजाने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून बोल्टने २० धावांत ३ तर सोधीने १७ धावांत २ बळी घेतले.

Live Updates
19:40 (IST) 31 Oct 2021
दुसऱ्या षटकात भारत

दुसऱ्या षटकात राहुलने भारतासाठी पहिला चौकार ठोकला. भारताने बिनबाद ६ धावा केल्या आहेत.

19:35 (IST) 31 Oct 2021
पहिल्या षटकात भारत

पहिल्या षटकात भारताने बिनबाद एक धाव केली.

19:30 (IST) 31 Oct 2021
भारताचे सलामीवीर मैदानात

केएल राहुल आणि डावखुरा इशान किशन हे भारताचे सलामीवीर मैदानात आले आहेत.

19:12 (IST) 31 Oct 2021
भारतीय संघात दोन बदल

आज विराटने शार्दुल ठाकूर आणि इशान किशनला संधी दिली आहे. मुंबईकर खेळाडू सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे आजच्या सामन्यातून बाहेर पडला आहे. शार्दुलने भुवनेश्वरची जागा घेतली आहे.

19:07 (IST) 31 Oct 2021
दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, इशान किशन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, डेव्हन कॉन्वे (यष्टीरक्षक), ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, मिचेल सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी, अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.

19:05 (IST) 31 Oct 2021
न्यूझीलंडनं जिंकला टॉस

न्यूझीलंडचा कप्तान केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.

17:40 (IST) 31 Oct 2021
आज विराट पाडणार विक्रमांचा पाऊस?

IND vs NZ : काय सांगता..! आज विराट पाडणार विक्रमांचा पाऊस? एक, दोन नव्हे, तर…

17:37 (IST) 31 Oct 2021
कधी, कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार सामना?

T20 WC IND vs NZ : कधी, कुठे, कसा आणि केव्हा पाहता येणार LIVE सामना? जाणून घ्या एका क्लिकवर!

17:36 (IST) 31 Oct 2021
टी-२० विश्वचषकात किवी संघाचे वर्चस्व

टी-२० विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडमध्ये आतापर्यंत दोन सामने झाले असून त्यात किवी संघाने वर्चस्व राखले आहे. न्यूझीलंडने २००७ च्या टी-२० विश्वचषकात भारताचा १० विकेट्सने तर २०१६ टी-२० विश्वचषक स्पर्धेत ४७ धावांनी पराभव केला होता.

17:34 (IST) 31 Oct 2021
करो वा मरो सामना!

गट २ मधील भारत आणि न्यूझीलंड यांच्यासाठी हा 'करो किंवा मरो' सामना असेल, कारण कोणताही संघ हरेल त्याला उपांत्य फेरी गाठणे कठीण जाईल. त्यांच्या गटातील गुणतालिकेत भारत सध्या पाचव्या, तर न्यूझीलंड चौथ्या क्रमांकावर आहे. त्याचबरोबर पाकिस्तानी संघाने सलग तीन सामने जिंकून अंतिम चारमधील आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. आता एकच जागा रिक्त असून, त्यासाठी कडवी झुंज सुरू आहे. ग्रुपमधील अव्वल दोन संघांनाच उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल.

17:34 (IST) 31 Oct 2021
दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन

भारत – विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार/शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह.

न्यूझीलंड – केन विल्यमसन (कर्णधार), मार्टिन गप्टिल, डॅरिल मिशेल, डेव्हन कॉन्वे, ग्लेन फिलिप्स, जिमी नीशम, टिम सेफर्ट (यष्टीरक्षक), मिचेल सेंटनर, ईश सोधी, टिम साउदी/अॅडम मिल्ने, ट्रेंट बोल्ट.